कपिल शर्माने नुकताच त्याचा वाढदिवस परिणीती चोप्रा आणि आयुषमान खुरानासोबत साजरा केला. पण त्याच्या या वाढदिवसादिवशी त्याची जुनी टीम मात्र कुठेच नव्हती. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात झालेल्या वादामुळे त्यांनी वाढदिवसालाही कपिलला शुभेच्छा दिल्या नाहीत. कपिलच्या जुन्या टीमपैकी फक्त किकू शारदाने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनी वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छांबद्दल कपिलने त्याचे आभार मानले. ‘तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. राजस्थानच्या जंगलात चित्रीकरण करत आहे. त्यामुळे ऑनलाइन येऊ शकत नाही. नेहमी आनंदी राहा.’
कपिल सध्या ‘फिरंगी’ सिनेमाच्या चित्रीकरणासाठी राजस्थानमध्ये गेलाय. ‘द कपिल शर्मा शो’च्या चित्रीकरणासाठी तो सध्या मुंबई-राजस्थान असा प्रवास करत आहे. सुनीलसोबत झालेल्या प्रकरणात त्याला त्याची चूक कळली होती. म्हणूनच त्याने सोशल मीडियावर सुनील ग्रोवरची माफीही मागितली.
Thank u all for ur love n best wishes.. shooting in forests of rajasthan .. so couldn't come on line.. love always..stay happy
— KAPIL (@KapilSharmaK9) April 3, 2017
‘पाजी, माझ्यामुळे तू दुखावला गेला असशील तर मी तुझी माफी मागतो. तुला माहितीये की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मलाही झालेल्या प्रकाराबद्दल दुःख आहे,’ असे ट्विट कपिलने केले होते. ट्विटसोबतच फेसबुकवरही त्याने या प्रकरणाशी निगडीत पोस्ट शेअर केली होती. ‘सुप्रभात मित्रांनो, मी माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर काळ एन्जॉय करत असतानाच सुनील आणि माझ्या भांडणाची बातमी माझ्या कानावर आली. पहिल्यांदा ही बातमी कुठून येत आहे ते बघा. जर मी त्याच्यासोबत भांडलो तर तुम्हाला ज्यांनी ही बातमी सांगितली ते विश्वासार्ह आहेत का? काही लोकांना अशा गोष्टी पसरवण्यात आनंद मिळतो. आम्ही एकत्र प्रवास करतो, मी माझ्या भावाला वर्षातून एकदा भेटतो पण प्रत्येक दिवस मी माझ्या टीमसोबत घालवतो. खासकरुन सुनीलसोबत. माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मी त्याचा आदरही करतो. हो आमच्यात थोडी बाचाबाची झाली. पण आम्ही माणसं नाही का? गेल्या पाच वर्षांमध्ये मी पहिल्यांदा त्याच्यावर ओरडलो. एवढं तर चालतच. मी आपल्या प्रसारमाध्यमांचाही आदर करतो. पण आपल्याकडे इतर गंभीर समस्याही आहेत ज्याच्यावर लक्ष देणं अधिक गरजेचं आहे. माझा आणि सुनीलमधला वाद आपल्या देशाच्या सुरक्षिततेपेक्षा मोठा आहे का? एक कुटुंब म्हटल्यावर अशा घटना घडत असतात. मी आणि सुनील यातून नक्कीच मार्ग काढू. अशा गोष्टींची मजा घेऊ नका,’ अशी पोस्ट कपिलने फेसबुकवर शेअर केली होती.
कपिलने जाहीर माफी मागितली असली तरी सुनील, अली किंवा चंदन हे मात्र त्याला माफ करण्याच्या मनःस्थितीत नाही. कपिल आणि सुनीलच्या या वादाचा सर्वात मोठा फटका कोणाला बसला असेल तर तो त्यांच्या चाहत्यांना. ‘द कपिल शर्मा शो’चा टीआरपीही फार घसरला. त्यामुळे सोनी एंटटेन्मेंटने कपिलला एका महिन्याची मुदत दिली आहे. जर या महिन्याभरात कपिलने सुनीलला आणि इतर सहकाऱ्यांना शोमध्ये परत आणले नाही तर हा शो बंदही पडू शकतो. तर दुसरीकडे सुनील सध्या लाइव्ह शोवरच लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 2:20 pm