24 January 2019

News Flash

मी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा

या झगमगत्या दुनियेत काय खरं आणि काय खोटं याची मला पूर्ण कल्पना आहे. इथे तुमचं जवळचं असं कोणीच नसतं

अप्रतिम विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा यांच्या जोरावर कपिलने २००७ मध्ये 'ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' हा शो जिंकला आणि कॉमेडी किंग म्हणून ओळखू लागला.

काही दिवसांपूर्वी कपिल शर्माने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एका मागोमाग एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये कपिलने अश्लिल शिवीगाळ केली होती. कपिलच्या चाहत्यांना या ट्विटमध्ये त्याच्या मनात दाबून राहिलेला राग दिसत होता. तर एका पत्रकाराने त्याचे आणि कपिलचे बोलणे रेकॉर्ड करुन यू-ट्यूबवर व्हायरल केले होते. या कॉलमध्येही कपिल त्या पत्रकाराशी असभ्य भाषेत बोलताना दिसत आहे. या सर्व प्रकरणात काहींनी कपिलवर ताशेरे ओढले तर काहींनी त्याला पाठिंबाही दर्शवला.

रिपोर्टनुसार, कपिल म्हणाला की, तो शिवीगाळ करुन स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो. बॉलिवूड न्यूजने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पत्रकार सुभाष के. झा यांनी या संपूर्ण प्रकरणावर कपिलशी बातचीत केली. सुभाष यांच्याशी बोलताना कपिल म्हणाला की, ‘मी जे काही केले त्याचा मला अजिबात पश्चाताप नाही. या झगमगत्या दुनियेत काय खरं आणि काय खोटं याची मला पूर्ण कल्पना आहे. इथे तुमचं जवळचं असं कोणीच नसतं. फायद्यासाठी तुमच्या स्टारडमचा उपयोग केला जातो. जेव्हा त्यांचे काम होते तेव्हा ते तुम्हाला दूर करतात.’

गेल्या काही दिवसांमध्ये जे काही झाले त्यावरु कपिल फारच अस्वस्थ होता. ‘प्रत्येकाचा राग व्यक्त करण्याचा एक वेगळा मार्ग असतो. माझ्यासोबत जे झाले तसेच तुमच्यासोबत झाले असते तर तुम्ही काय केले असते? मी माझा राग शिव्या देऊन व्यक्त करतो.’ कपिलने काही दिवसांपूर्वी चार ट्विट केले होते. या चारही ट्विटमध्ये भारतातली प्रसारमाध्यमं आणि सरकारी यंत्रणा किती निष्फळ आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याच्या या ट्विटमध्ये असभ्य भाषाच जास्त होती. यावेळी तो म्हणाला की, ‘स्वतःच्या वृत्तपत्राचा खप करण्यासाठी चांगल्या माणसाविरोधात नकारात्मक बातम्या छापू नका. तो एक चांगला माणूस आहे आणि मला खात्री आहे की तो लवकरच बाहेर येईल. खोटी बातमी छापण्यासाठी तुम्ही किती पैसे घेता? आताची पत्रकारिता ही विकलेली आहे.’ यावेळी त्याने ‘स्पॉटबॉय’ या वेबसाइटला अश्लिल शिवीगाळही केली.

First Published on April 16, 2018 2:33 pm

Web Title: kapil sharma says people express their anger in different ways i feel peace when i abuse