सुप्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माने मनोरंजन विश्वातील घडामोडी सांगणारे न्यूज पोर्टल चालवणाऱ्या विक्की लालवानीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. एवढेच नाही तर नुकसान भरपाई म्हणून लालवानीने १०० कोटींची भरपाई द्यावी अशीही मागणी केली आहे. विक्की लालवानीने माझ्याविरोधात खोटे आणि अपमान करणारे लेख प्रकाशित केले आहेत. याबाबत त्याने सार्वजनिकरित्या माझी जाहीर माफी मागावी आणि माझी बदनामी केल्याप्रकरणी १०० कोटींची भरपाई द्यावी असे कपिलने म्हटले आहे.

विक्की लालवानी जे पोर्टल चालवतो त्यामुळे कपिलची प्रतिमा डागाळली असा आरोप कपिलचे वकील तनवीर निजाम यांनी केला आहे. विक्की लालवाणीविरोधात कथित चुकीचे, अपमान करणारे लेख प्रसिद्ध केल्या प्रकरणी आम्ही ही नोटीस बजावली आहे. लालवानीने दिलेल्या लेखांमुळे कपिलच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. या सगळ्याची नुकसान भरपाई म्हणून कपिलला लालवानीने १०० कोटींची भरपाई द्यावी असेही म्हटले आहे.

लालवानीने त्याच्या पोर्टलवर माझ्या अशीलाची म्हणजेच कपिल शर्माची बदनामी करणारे लेख जाणीवपूर्वक प्रकाशित केले आहेत. येत्या सात दिवसात या सगळ्या प्रकरणी लालवाणीने कपिल शर्माची जाहीर माफी मागावी अशीही मागणी तनवीर निजाम यांनी केली आहे. जर लालवानीने सात दिवसांच्या आत माफी मागितली नाही तर आम्ही त्यांच्यावर पोलीस कारवाई कशी होईल हे पाहू असेही म्हटले आहे. अब्रू नुकसानीची भरपाई म्हणून जे १०० कोटी रुपये मागितले आहेत ते राष्ट्रीय संरक्षण कोषात दिले जातील असेही या नोटीशीत स्पष्ट करण्यात आले आहे. आता या नोटीशीला विक्की लालवानी काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.