गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. यातच नुकताच अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर आता छोट्या पडद्यावरील विनोदवीर कपिल शर्मा आणि त्याची प्रेयसी गिन्नी चतरथ यांच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. कपिल आणि गिन्नी पुढील महिन्यात १२ डिसेंबर रोजी लग्न करणार असून त्यांच्या लग्नातील कार्यक्रमांचे डिटेल्स समोर आले आहेत. कपिल त्याच्या मूळगावी जालंधरजवळ असलेल्या फगवाडा येथे गिन्नीसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

हिंदू रितीरिवाजाप्रमाणे कपिल-गिन्नी लग्न करणार असून यावेळी केवळ मोजक्या पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात येणार आहे. कपिल आणि गिन्नीच्या घरातल्यांनी लग्नाची तयारी सुरु केली असून १० डिसेंबरपासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे.


१० तारखेला कपिलच्या बहीणीच्या घरी जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून ११ डिसेंबर रोजी जालंधरमध्ये गिन्नीच्या घरी संगीत आणि मेहंदीचा सोहळा रंगणार आहे. त्यानंतर १२ डिसेंबरला ही जोडी लग्नगाठ बांधणार आहे. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी अमृतसरमध्ये एका रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.

दरम्यान, कलाविश्वातील मित्रमंडळींसाठी कपिलने मुंबईमध्ये देखील एक पार्टी आयोजित केली असून २४ डिसेंबरला ही पार्टी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर लगेच कपिलाचा आगामी ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा शो २५ डिसेंबरला ऑन एअर येण्याची शक्यता आहे.