मुंबईतील कार्यालयासंबंधी महापालिकेशी वाद झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अच्छे दिन’ आणि भ्रष्टाचारमुक्त अभियानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ट्विट कॉमेडियन कपिल शर्माने केले होते. ते ट्विट दारुच्या नशेत केल्याची अप्रत्यक्ष कबुलीच खुद्द कपिल शर्माने दिली आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये मोदींविषयी केलेल्या ट्विटबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्याने हे उत्तर दिले आहे.

करण जोहरच्या चॅट शोला म्हणजेच ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाला त्याच्या वेगळ्या स्वरुपामुळे प्रेक्षकांची पसंती मिळते. करणच्या कार्यक्रमाचे स्वरुप, अतरंगी प्रश्न, त्यावर सेलिब्रिटींची उत्तरं आणि एकंदर रंगणारी गप्पांची मैफल याबद्दल देखील बी टाऊनमध्ये नेहमीच चर्चा रंगत असते. करण जोहरच्या या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये यावेळी विनोदवीर कपिल शर्मा याने हजेरी लावली. कपिलच्या येण्याने करणच्या कार्यक्रमामध्ये त्याचा देसी टच पाहायला मिळाला.

करणच्या या शोमध्ये सर्वसाधारणपणे येणारे पाहुणे हे इंग्रजीमध्येच बोलतात. पण कपिलला फारसे इंग्रजी येत नसल्यामुळे त्याने हिंदीमध्येच उत्तर देण्याचे ठरवले होते. ‘माझ्या शब्दकोशमध्ये फक्त ७०० इंग्रजी शब्द आहेत त्यामुळे मी हिंदीतच बोलेन,’ असे त्याने सुरुवातीलाच सांगितले. करणच्या या शोमध्ये कपिलने पहिल्यांदाच हजेरी लावली होती. असे असले तरी दोघांनी अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये एकत्रित सुत्रसंचालन केले आहे.

या शोमध्ये कपिल गेल्यावर्षी नरेंद्र मोदींना केलेल्या ट्विटचा खुलासा करणार आहे. या प्रोमोमध्ये जेव्हा करणने जेव्हा कपिलला नरेंद्र मोदी यांना केलेल्या ट्विटचा प्रश्न विचारला तेव्हा कपिल म्हणाला की, ‘जसे दारु पिऊन गाडी चालवणे चुकीचे आहे त्याचप्रमाणे दारु पिऊन ट्विट करणेही चुकीचे आहे.’ त्याच्या या उत्तरातून हे स्पष्ट होते की, जेव्हा कपिलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट केले होते तेव्हा त्याने मद्यपान केले होते. त्यामुळेच आता तो दारुच्या नशेत ट्विट करु नका असा सल्ला इतरांना देताना दिसत आहे.

गेल्या वर्षी मुंबईमध्ये ऑफिस बनवण्यासाठी कपिलचा महापालिकेसोबत वाद झाले होते. यानंतर कपिलने मध्यरात्री मोदी यांना ट्विट करत मोदींच्या अच्छे दिन आणि भ्रष्टाचार मुक्त अभियानावर प्रश्न उपस्थित केले होते. त्याच्या या ट्विटवर तेव्हा अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे या शोमधले त्याचे वक्तव्यही अनेक चर्चांना उधाण आणेल यात काही शंका नाही.