‘किस किस से प्यार करुं’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या कपिल शर्माचा ‘फिरंगी’ हा दुसरा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या मोशन पोस्टरमध्ये तो एका ब्रिटीश अधिकाऱ्याला लाथ मारताना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल या सिनेमाचे प्रमोशन छोट्या पडद्यावर करणार नाही. टीव्हीऐवजी तो प्रसारमाध्यमांना मुलाखती देण्यावर अधिक भर देणार आहे.

कपिलच्या म्हणण्यानुसार, सगळेच त्यांच्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी त्याच्या शोमध्ये यायचे. आता त्याचा शो बंद झाल्यामुळे तो कोणत्या कार्यक्रमात प्रमोशन करण्यासाठी जाईल, हा प्रश्न पडला आहे. कपिलचा हा सिनेमा १० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘फिरंगी’ हा कपिलच्या प्रोडक्शन हाऊसचीच निर्मिती असलेला सिनेमा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कपिल आजारी होता. पण आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याने कामाला पुन्हा सुरूवात केली आहे.

या सिनेमात कपिलसोबत ईशिता दत्ता आणि मोनिका गिल झळकणार आहेत. इतकंच नाही तर नेहमी विनोदाची फटकेबाजी करणारा कपिल या सिनेमात एक गाणंही गायला आहे. तेव्हा आता हा ‘फिरंगी’ प्रेक्षकांची मनं जिंकतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कपिल शर्माचा पहिला सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर फारशी जादू करु शकला नव्हता. पण, ‘फिरंगी’कडून फक्त कपिललाच नाही तर प्रेक्षकांनाही बऱ्याच अपेक्षा आहेत.