जेष्ठ बॉलिवूड अभिनेते रणधीर कपूर यांनी सोमवारी आपल्या कुटुंबियांसमवेत ६९ वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. यावेळी करिना आणि करिश्मा या त्यांच्या दोन मुली, पत्नी बबीता आणि जावई सैफ अली खान, नीतू कपूर, ऋषि कपूर, रिमा जैन आणि अरमान जैनसह कुटुंबातील अनेकजण उपस्थित होते. रणधीर कपूर यांचा लाडका असलेला रणबीर कपूर ‘जग्गा जासूस’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त असल्याने वाढदिवसाच्या पार्टीत उपस्थित राहू शकला नाही. रणधीर कपूर यांना चित्रपट क्षेत्र हे वारसाने मिळाले आहे. त्यांचे वडील राज कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. तर रणधीर कपूर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात ‘श्री ४२०’ चित्रपटात बालकलाकार म्हणून केली होती. ‘दो उस्ताद’ चित्रपटात काम केलेल्या रणधीर कपूर यांनी १९६८ सालच्या ‘झुक गया आसमान’ चित्रपटादरम्यान सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले होते. १९७१ च्या ‘कल आज और कल’ चित्रपटात अभिनय केलेल्या रणधीर कपूर यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात देखील पाऊल ठेवले. चित्रपटात कपूर कुटुंबातील पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि रणधीर कपूर या तीन पिढ्यांनी अभिनय केला होता. याशिवाय बबीतानेदेखील महत्वाची भूमिका साकारली होती.