हिंदी चित्रपटसृष्टीचे शो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले स्वर्गिय अभिनेते राज कपूर यांचा नातू अरमान जैन लवकरच मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहे. ‘लेकर हम दिवाना दिल’ चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अरमान हा राज कपूर यांची धाकटी मुलगी रिमा आणि मनोज जैन यांचा मुलगा आहे. राज कपूर यांचा नातू अशी चित्रपटसृष्टीत ओळख असल्याचा त्याला आनंदच वाटतो. तर, कपूर कुटुंबीय खाणे आणि गप्पांचे चाहते असल्याचे या तरुण कलाकाराचे म्हणणे आहे. जेव्हा कपूर कुटुंबीय एकत्र जमताता तेव्हा खाण्याच्या चर्चेबरोबर प्रचंड कल्ला होत असल्याचे सांगत तो म्हणाला, आम्ही कपूर कुटुंबीय फक्त खाण्यावरच चर्चा करतो. जेव्हा आम्ही सर्व एकत्र जमतो, तेव्हा एकमेकांची थट्टा-मस्करी करतो. कोणीही चित्रपट आणि अभिनयाबाबत बोलत नाही, फक्त खाण्या-पिण्यावर चर्चा आणि गडबड गोंधळ असतो. खूप गोंधळाचे वातावरण असले, तरी त्यातसुद्धा मजा असल्याचे तो म्हणाला. एव्हढी मोठी अभिनयाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आपण आलो असलो, तरी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आपल्यावर कोणतेही दडपण नसल्याचे तो आवर्जून सांगतो. लोकांचे मनोरंजन करणे आणि त्यांना आनंद देणे हे आपल्यासाठी प्राधान्याचे असल्याचे सांगत, सर्कशीत जोकर बनणे अथवा चित्रपटात काम करणे ही दोन क्षेत्रे लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी उत्कृष्ट असल्याचे मत त्याने व्यक्त केले. अरमान काम करत असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाझ अलीचा भाऊ आरिफने केले असून, चित्रपटातील प्रमुख नायिका दीक्षा सेठचादेखील हा पहिलाच चित्रपट आहे. अभिनेत्री करिना कपूर खानचा पती सैफ अली खान या चित्रपटाचा निर्माता आहे. जुलैच्या ४ तारखेला ‘लेकर हम दिवाना दिल’ चित्रपटगृहात दाखल होत आहे.