‘द लंचबॉक्स’ चित्रपटाची ऑस्करवारी चुकल्याने दिग्दर्शक रितेश बत्रा आणि निर्माता अनुराग कश्याप निवड समितीवर नाराज झाले आहेत.निवड समितीने ‘द लंचबॉक्स’ ऐवजी गुजराती ‘सिनेमा द गुड रोड’ला पसंती दिली आहे. त्यामुळे यंदा ऑस्करवारीसाठी ‘द गुड रोड’ हा सिनेमा भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
‘द लंचबॉक्स’ हा चित्रपट रितेश बत्राने दिग्दर्शित केला आहे, तर अनुराग कश्यप आणि गुनीत मोंगा हे निर्माते आहेत.  
‘द लंचबॉक्स’ला ऑस्करसाठी एन्ट्री दिली असती, तर  या सिनेमाने सर्वोत्कृष्ठ परदेशी चित्रपट या गटात टॉप ५ मध्ये स्थान मिळवलं असतं, असा विश्वास कश्यप यांना होता. मात्र निवड समितीने ऑस्कर एन्ट्रीसाठी ‘द गुड रोड’ला पसंती दिली. त्यामुळे कश्यप खूपच नाराज आहे.
“ मी खूप म्हणजे खूपच नाराज आहे. मी न पाहिलेल्या सिनेमाबाबत बोलणार नाही. पण हा सिनेमा टॉप ५ मध्ये स्थान मिळवू दे. मी प्रार्थना करतो की, माझे माझ्या चित्रपटाबाबतचं मत खोटं ठरो, आणि निवड समितीने निवडलेला चित्रपटा सर्वांच्या पसंतीला उतरो, अशी आशा आहे” असं कश्यप यांनी ट्वीट केले आहे. तसेच, दिग्दर्शक-निर्माता करण जोहरनेही नाराजी व्यक्त केली आहे. ‘द लंचबॉक्स’चे सादरीकरण करण जोहरने केले आहे. एक सुवर्णसंधी गमावल्याचे करण जोहर म्हणाला आहे.