बॉलिवूड अभिनेता सुशांत राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला. सुशांतच्या चाहत्यांनी करण जोहर, सलमान खान, सोनम कपूर, अनन्या पांडे, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा अशा अनेक कलाकारांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही कलाकारांनी ट्रोलिंगला कंटाळून कमेंट बॉक्स प्रायव्हेट केले तर काहींनी सोशल मीडियाला रामराम ठोकला. आता करण जोहरने नवे प्रायव्हेट अकाऊंट बनवले असल्याचे म्हटले जात आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर नेटकऱ्यांनी करण जोहरवर निशाणा साधला होता. त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. आता त्याने ट्रोलिंगला कंटाळून इन्स्टाग्रामवर नवे अकाऊंट क्रिएट केल्याचे म्हटले जात आहे. पण करण हे अकाऊंट प्रायवेट ठेवले आहे.

‘karanafffairs’ या नावाने हे अकाऊंट असल्याचे म्हटले जात आहे. हे अकाऊंट मात्र वेरिफाइड नाही. पण हे अकाऊंट मोठे मोठे कलाकार फॉलो करत आहेत. त्यामध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची पत्नी गौरी खानचा समावेश. तसेच अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन, अनन्या पांडे हे फॉलो करताना दिसत आहेत. त्यामुळे हे अकाऊंट करण जोहरचे असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

एका मुलाखतीत करणच्या मित्राने त्याच्यावर ट्रोलिंगचा परिणाम झाला असल्याचे सांगितले होते. “सुशांतच्या आत्महत्येनंतर होत असलेल्या ट्रोलिंगमुळे करण पूर्णपणे हादरला आहे. त्याच्या तीन वर्षांच्या जुळ्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या सर्वांचा त्याच्यावर खूप परिणाम होत आहे. करणला जेव्हा कधी मी फोन करतो, तेव्हा तो रडतो. यात माझी काय चूक आहे, असा प्रश्न तो विचारतो”, असे करणच्या मित्राने सांगितले होते.