24 November 2017

News Flash

करण म्हणतोय, ‘कंगना या गोष्टीपासून दूर राहा!’

कंगनाला करणचा महत्त्वपूर्ण सल्ला

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 2:24 PM

कंगना रणौत, करण जोहर

सध्या बी-टाऊनमध्ये सर्वांत जास्त चर्चा कोणत्या अभिनेत्रीची होत असेल तर ती कंगना रणौत. कंगनाशी सहमत असणारा एक गट आणि तिच्यावर टीका करणारा एक गट, असे दोन गटच निर्माण झाले आहेत. यामागचं कारण म्हणजे पत्रकार रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात तिने केलेले खुलासे. हृतिक रोशन, आदित्य पांचोली, अध्ययन सुमन, करण जोहर यांच्यासंदर्भात तिने या मुलाखतीत बेधडक वक्तव्ये केली. आपल्या या वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या कंगनाने नुकताच एआईबी या युट्यूब चॅनलसाठी एक व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओमध्ये सहसा उल्लेख न केल्या जाणाऱ्या शब्दांचा सहजपणे वापर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता दिग्दर्शक करण जोहरने तिला ट्विटरच्या माध्यमातून एक सल्ला दिला आहे.

या ट्विटमध्ये कंगनाचं नाव न घेता त्याने लिहिलं की, ‘डिअर टॅलेंट, तू अतिआत्मविश्वास आणि भ्रम या गोष्टींपासून दूर राहावं असं मला वाटतं. या गोष्टी सातत्याने तुझ्याविरोधात कट रचत आहेत. हे तुला दिसत नाही का?’

कंगनाच्या ‘द बॉलिवूड दीवा’ या व्हिडिओमध्ये ‘चिटियाँ कलाईयाँ’ या गाण्याची चाल वापरून नवे शब्द लिहिले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये चित्रपटसृष्टीतील काही कटू सत्य उपरोधिकपणे मांडण्यात आले आहे. करणच्या ‘कभी खुशी कभी गम’ या गाण्याची पार्श्वभूमीदेखील यात वापरण्यात आली. बॉलिवूडमध्ये ठराविक लोकांचं असलेलं वर्चस्व, महिलांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक यांसारख्या गोष्टींवर प्रकाश पाडत करण आणि हृतिकलाही टोला लगावण्यात आला आहे. म्हणूनच करणने ट्विटरच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे कंगनाला अतिआत्मविश्वासापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. यावर कंगना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

First Published on September 13, 2017 2:24 pm

Web Title: karan johar has sent out a suggestive new tweet which seems to be aimed at kangana ranaut