बॉलिवूड सेलिब्रिटी गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाउनमुळे घरीच आहेत. आता अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकत असताना काही सेलिब्रिटी घराबाहेर पडत आहेत. फिटनेस किंवा वैयक्तिक कामासाठी हे सेलिब्रिटी घराबाहेर पडताना दिसत आहेत. अशातच निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घराबाहेर शुक्रवारी संध्याकाळी काही सेलिब्रिटी पाहायला मिळाले. अनिल कपूर, नीतू कपूर आणि कियारा अडवाणी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र या सेलिब्रिटींनी करणच्या घरी हजेरी का लावली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणानंतर करण जोहर सोशल मीडियापासून लांबच राहू लागला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर करणने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. मात्र त्यानंतर त्याला नेटकऱ्यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून जोरदार ट्रोल केलं. तेव्हापासून करण जोहर माध्यमांसमोर आला नाही आणि तो सोशल मीडियावरही व्यक्त होत नाहीये.

काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सच्या कार्यालयाबाहेर कियारा अडवाणी व वरुण धवन दिसले होते. हे सर्व कलाकार करणच्या आगामी चित्रपटाबाबत भेट घेत आहेत की आणखी काही कारण आहे, याबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.