दिग्दर्शन, निर्मिती, लेखन, अभिनय, सूत्रसंचालन अशा विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर आता करण जोहरने त्याचा मोर्चा रेडिओकडे वळवला आहे. इश्क ‘104.8’ एफएमवर त्याचा शो ‘कॉलिंग करण’ आजपासून सुरू होत आहे. त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

बॉलिवूडला एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारा करण आता रेडिओ जॉकी झाला आहे. विशेष म्हणजे या शोच्या माध्यमातून तो नातेसंबंध, प्रेम या विषयांवर सल्ले देणार आहे. म्हणजेच तो ‘लव्ह गुरु’ होणार आहे, असं म्हणायला हरकत नाही. सोमवार ते शुक्रवार असे आठवड्याचे पाच दिवस आणि दिवसातून दोनदा त्याचा हा शो ‘ऑन एअर’ जाईल.

करणने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शोचा टीझर पोस्ट केला. या टीझरमध्ये एक कॉलर त्याला आपली कहाणी सांगत आहे आणि ते ऐकून करणचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळत आहे. पण इतक्यातच एक दुसरा आरजे त्याच्याजवळ येऊन सांगतो की रेडिओवर तुम्हाला कोणी पाहू शकत नाही, इथे फक्त तुमचा आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचवता येतो. आरजेचं आव्हान पेलण्यासाठी करणची सुरु असलेली तयारीसुद्धा मजेशीर पद्धतीने यामध्ये दाखवण्यात आली आहे.

खरंतर लव्ह गुरुची भूमिका करण अतिशय उत्तमरित्या वठवेल यात तिळमात्र शंका नाही. त्याचा हा नवीन शो आता चाहत्यांना कितपत आवडेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.