बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरने दिलेल्या एका पार्टीवरून चांगलंच राजकारण रंगलं होतं. या पार्टीत उपस्थित असलेले सेलिब्रिटी ड्रग्जच्या नशेत होते, असा आरोप करण्यात आला होता. आता या सर्व आरोपांवर अखेर करणने मौन सोडलं आहे. हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचं स्पष्टीकरण करणने दिलं आहे. त्याचसोबत यापुढे असे आरोप केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्याने दिला आहे.

दीपिका पदुकोण, रणबिर कपूर, विकी कौशल, अर्जून कपूर, मलाइका अरोरा, शाहीद कपूर, चित्रपट निर्माते अयान मुखर्जीसारखे सिनेसृष्टीतील तारे-तारका उपस्थित असलेल्या या पार्टीचा व्हीडिओ करण जोहरने सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. ड्रग्जच्या नशेत असल्याच्या आरोपांवर पार्टीत उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींपैकी अद्याप कोणीच काही वक्तव्य केलेलं नाही. पत्रकार राजीव मसंदला दिलेल्या मुलाखतीत करण म्हणाला, ”आठवडाभर काम केल्यानंतर इंडस्ट्रीतील माझे मित्र-मैत्रीण त्या पार्टीला एकमेकांसोबत वेळ घालवण्यास आले होते. जर तिथे ड्रग्जची पार्टी होत असती तर मी स्वत: व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला असता का? मी मूर्ख नाहीये.”

आणखी वाचा : ‘आशिकी २’ फेम आदित्य रॉय कपूरचा लवकरच साखरपुडा?

या व्हिडीओत दिसणाऱ्या काही गोष्टींवर स्पष्टीकरण देत तो पुढे म्हणाला, ”हे आरोप ऐकून असं म्हणता येईल की तुम्हाला नाक खाजवण्याची परवानगी नाही, तुम्ही तुमचा फोन मागच्या खिशात नाही ठेवू शकत आणि प्रकाशाची छाया कुठल्यातही ड्रग्जच्या पावडरसारखी भासते. विकीला डेंग्यू झाला होता आणि तो कोमट लिंबू पाणी पित होता. माझी आई तिथे बसली होती. आम्ही सगळे एकत्र खात-पित होतो, गाणी ऐकत होतो आणि गप्पा मारत होतो. याव्यतिरिक्त तिथे काहीच होत नव्हतं.”

”तथ्यहीन आरोपांवर मी प्रतिक्रिया देणं टाळतोच. कारण ते तथ्यहीनच असतात. पण यावेळी तर हद्दच झाली. यापुढे जर असे काही आरोप माझ्यावर झाले तर मी थेट कायदेशीर कारवाई करेन,” असा इशारा करणने दिला.