निर्माता-दिग्दर्शक करण जोहर नेहमीच त्याच्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकतो. प्रेम, प्रेमभंग, मैत्री यांसारख्या विविध भावभावनांना एका वेगळ्या नजरेतून प्रेक्षकांसमोर सादर करत करणने नेहमीच रसिकांची दाद मिळवली आहे. चित्रपटांच्या माध्यमातून व्यक्त होणारा करण अनेक परिसंवादांमध्ये आणि विविध कार्यक्रमांमध्ये ज्यावेळी हजेरी लावतो त्यावेळी तो कधीच स्वत:च्या खासगी बाबी लपवून ठेवत नाही. आपण गे असल्याचा खुलासाही त्यानी याआधी केला आहे. करण जोहरने त्याच्या आत्मचरित्रपर पुस्ताकामध्ये स्वत:विषयीच्या बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यासोबतच करणने त्याच्या आणि इतर काही कलाकारांसोबतच्या त्याच्या नात्याविषयीसुद्धा लिहिले आहे.

अभिनेत्री काजोलसोबत असलेल्या मतभेदांविषयीही करणने या पुस्तकात लिहिले आहे. सध्या ‘केजो’च्या पुस्तकातील म्हणजेच त्याच्या जीवनातील आणखीन एक पान सर्वांसमोर आले आहे. करणच्या ‘द अनसुटेबल बॉय’ या पुस्तकानुसार २००२ मध्ये करिना आणि त्याच्या नात्यामध्ये दुरावा आला होता. या मतभेदांमुळे हे दोन्ही कलाकार एकमेकांपासून जवळपास नऊ महिने बोलत नव्हते. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार करण जोहरने करिनाला त्याच्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटातील एका भूमिकेसाठी विचारले होते. पण, करिनाने मात्र या चित्रपटामध्ये ‘ती’ भूमिका साकारण्यासाठी जरा जास्तच मानधनाची मागणी केली होती. ज्यामुळे करिना आणि करणच्या नात्यात दुरावा आला होता.

करणने या पुस्तकात म्हटले आहे की, माझा सर्वात पहिला वाद करिनासोबत झाला होता. एका चित्रपटासाठी तिने जास्त मानधनाची मागणी केली होती. ज्या कारणास्तव आमच्यात दुरावा आला. ज्या आठवड्यात करिनाचा ‘मुझसे दोस्ती करोगे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्याच वेळी करणने ‘कल हो ना हो’ या चित्रपटाचा प्रस्ताव करिनासमोर मांडला होता. पण, त्यावेळी शाहरुख इतकेच मानधन मागितल्यामुळे मी तिला ‘सॉरी’ म्हटले होते.

वाचा: करण- काजोलच्या वादात आता अजय देवगणही

करण जोहरच्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान, प्रिती झिंटा आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटातील गाणी आणि सर्वांच्याच मनाचा ठाव घेणारे कथानक यामुळे चित्रपटाच्या वाट्याला चांगलेच यश आले होते. दरम्यान, करण जोहरने ज्या पुस्तकामध्ये त्याच्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवरुन आणि व्यक्तीवरुन पडदा उचलला आहे ते पुस्तक आणि त्या पुस्तकातील किस्से चांगलेच चर्चेत आले आहेत. ‘द अनसुटेबल बॉय’ या आत्मचरित्रपर पुस्कतामध्येही करणने त्याच्याबद्दलच्या काही बाबींचा उलगडा केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार त्यांनी करणच्या या आत्मचरित्रपर पुस्तकातील काही मुद्दे अधोरेखित केले आहेत. या पुस्तकातील काही भागामध्ये करणने आपल्या गे असल्याच्या प्रश्नावरुनही पडदा उचलला आहे.