६ सप्टेंबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल देताना समलैंगिकता हा गुन्हा ठरवणारे ३७७ कलम रद्द केले. या निर्णयानंतर आपली प्रतिक्रिया कशी होती, हे निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं. ‘द इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०१९’मध्ये तो बोलत होता.

”मी नुकताच उठलो होतो आणि (तो निर्णय ऐकून) मला रडूच कोसळलं. समाजातील त्या घटकासाठी माझे डोळे पाणावले. अखेर स्वातंत्र्य मिळालं या वास्तवापोटी मला अश्रू अनावर झाले. तो खरंच एक ऐतिहासिक निर्णय होता”, असं करणने आनंद व्यक्त केला.

आणखी वाचा : ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’, म्हणत प्रियांकाने करीनाला दिलं होतं सडेतोड उत्तर

”समलैंगिक व्यक्तींना कौटुंबिक व व्यक्तिगत पातळीवर उभे राहण्यासाठी समाजाने मदत करावी. एक भारतीय म्हणून येत्या काळात समलैंगिक विवाहांना भारतात परवानगी मिळावी अशी मी आशा करतो,” असं म्हणत हा बदलही लवकरच घडेल असा विश्वास त्याने व्यक्त केला. समलैंगिक संबंध आणि अशा इतरही मुद्द्यांवर करणने कायमच त्याच्या भूमिका स्पष्टपणे मांडल्या आहेत.