अभिनेता आमीर खाननंतर आता निर्माता-दिग्दर्शक करण जोहर असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता आहे. भारतात ‘मन की बात’ करणे अतिशय कठीण आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एक विनोद आहे आणि लोकशाही तर त्याहून मोठी थट्टा आहे, असे खळबळजनक विधान करण जोहरने केले आहे. गुरूवारी लिटरेचर फेस्टिव्हलदरम्यान लेखिका शोभा डे यांनी करण जोहरची मुलाखत घेतली त्यावेळी करणने आपले मत मांडले.
करण जोहर म्हणाला की, तुम्हाला तुमची ‘मन की बात’ करायची असेल किंवा तुमच्या खासगी आयुष्यातील गुपिते सर्वांसमोर सांगायचे असेल तर भारतात असे करणे फार कठीण आहे. एखादी कायदेशीर नोटीस कायम माझा पिच्छा पुरवत असते असे मला वाटते. इथे तुमच्या विरोधात कधी कुठे गुन्हा दाखल होईल, हे सांगता येत नाही. १४ वर्षांपूर्वी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यासही मी सामोरं गेलोय. आपले स्वतःचे मत मांडणे आणि लोकशाही बद्दल बोलणे हे देशातील दोन मोठे विनोद झाले आहेत. आपण फ्रीडम ऑफ स्पीचच्या गोष्टी करतो, पण जर तुम्ही सेलेब्रिटी असाल आणि तुम्ही तुमचे काही मत मांडले तर त्यामुळे वाद निर्माण होतात. पुरस्कार म्हणजे आपल्याला लोकांकडून मिळालेले प्रेम आहे. ते परत करणे किंवा नाकारणे योग्य नाही. जेव्हा तुम्ही आणि आम्ही ठरवू की आपल्या सहिष्णू बनायचे आहे तेव्हा हे जग बदलेल.