11 December 2017

News Flash

विश्वसुंदरीला डावलून करणची शाहरुखसोबत लग्न करण्याची इच्छा!

शाहरुखसोबत लग्न करण्याचे कारण देखील करणने यावेळी सांगितले

ऑनलाइन टीम | Updated: March 20, 2017 2:54 PM

शाहरुख खान आणि करण जोहर

बॉलिवूडमधील कलाकारांच्या प्रेम प्रकरणांची किंवा लग्नाची चर्चा रंगणे तसे नवे नाही. पण, हा मुद्दा जेव्हा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरशी जोडला जातो तेव्हा मात्र हा मुद्दा लैंगिकतेकडे वळताना दिसतो. करण जोहरवर अनेकदा लैंगिकतेविषयक प्रश्नांचा भडीमार झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र करण या मुद्याला कळीचा मुद्दा न करता मोकळेपणाने बोलताना दिसतो. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमातून बॉलिवूड कलाकारांना खुलेपणाने बोलते करणाऱ्या करणने ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारल्या.

या कार्यक्रमामध्ये करणला लैंगिकतेसोबतच एक बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आला होता. शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यापैकी तू कोणाशी मैत्री करशील? कोणासोबत लग्न करायला आवडेल? आणि कोणाला मारावेसे वाटेल? असे तीन गमतीशीर प्रश्न त्याला विचारण्यात आले. यावेळी करणने लग्नाच्या प्रश्नावर ऐश्वर्याचे नाव न घेता शाहरुखच्या नावाला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. तर, ऐश्वर्या आणि सिद्धार्थला मैत्रीपेक्षा मारायला आवडेल असे तो म्हणाला. करण फक्त शाहरुखसोबत लग्नास तयार असल्याचे सांगून थांबला नाही, तर शाहरुखसोबत लग्न करण्याचे कारण देखील त्याने यावेळी सांगितले. आपल्या बऱ्याचशा चित्रपटामध्ये काम केल्यामुळे नव्हे, तर त्याचा ‘मन्नत’ बंगला खूपच सुंदर आहे. त्यामुळे शाहरुखसोबत लग्न करायला आवडेल, असे तो म्हणाला. प्रेमाबद्दल बोलताना करण म्हणाला की, प्रेम ही संकल्पना खूपच सुंदर आहे. जे लोक प्रेमावर विश्वास ठेवतात त्यांच्यावर मी प्रेम करतो.

काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या ‘अॅन अनसुटेबल बॉय’ या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले होते. यामध्ये करण जोहरने वडिल बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी करण जोहरने मूल दत्तक घेण्याची किंवा सरोगसीच्या माध्यमातून वडिल होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर अविवाहित असलेल्या करणने सरोगसीद्वारे एकल पालकत्व स्विकारण्याचा निर्णय घेतला. त्याच्या घरी आता मुलगा आणि मुलगी अशा जुळ्या मुलांचे आगमन झाले आहे. आपल्या हृदयाचे हे दोन तुकडे आहेत, असे म्हणणाऱ्या करणने त्याच्या मुलांची नावे रुही आणि यश अशी ठेवली आहेत.

First Published on March 20, 2017 2:54 pm

Web Title: karan johar shah rukh khan bollywood homosexuality