गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडसह चाहत्यांमध्ये ज्या लग्नाची चर्चा होती असा रणवीर दीपिकाचा विवाहसोहळा आज संपन्न झाला. या विवाहसोहळ्याचे फोटो अद्यापही समोर आले नाहीत त्यामुळे चाहत्यांचा काहीसा हिरमोड झाला आहे. मात्र परिकथेला शोभेल असा हा विवाहसोहळा पाहण्याची संधी बॉलिवूडमधल्या काही मोजक्याच मंडळींना मिळाली. यात दिग्दर्शक करण जोहर होता.

पहिल्यांदा दीपिका आणि रणवीरला करणनं  सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. दोघांची जोडी नितांत सुंदर दिसत आहे, इतकी सुंदर की याक्षणी दोघांचीही नजर काढा असं करणनं म्हटलं. पण, यावेळी इटलीत उपस्थित असलेल्या करणनं दोघांचाही फोटो शेअर केला नाही म्हणूनच चाहते काहीसे नाराज झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी ट्विट करत करणकडे दोघांचे फोटो अपलोड करण्याची विनंती केली आहे.

मात्र दीपिका आणि रणवीरनं पाहुण्यांपुढे ठेवलेल्या अटीमुळे कोणालाही या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करता येणार नाही. फोटोग्राफर्सकडूनच फोटो मिळाल्यानंतर ते सोशल मीडियावर शेअर करावे अशी दोघांची इच्छा आहे. हे फोटो मोबाइमध्ये कोणीही काढू नये यासाठी मोबाइल कॅमेरा विशिष्ट स्टिकर्स लावून झाकण्यात आल्याचंही समजत आहे.

लेक कोमो परिसरात दीप वीरचा कोंकणी पद्धतीनं विवाहसोहळा पार पडला. १५ नोव्हेंबरला ते दोघंही पुन्हा सिंधी पद्धतीनं विवाहबंधनात अडकणार आहेत.