गेल्या वर्षभरात बॉलिवूड चित्रपटांमध्ये, कलाकारांमध्ये एक वेगळा ट्रेण्ड पाहायला मिळाला. हा ट्रेण्ड म्हणजे चित्रपटांचा अनोखा विषय आणि चौकटीबाहेरच्या भूमिका साकारणारे ठराविक अभिनेते. यात प्रामुख्याने विकी कौशल, राजकुमार राव, आयुषमान खुराना यांची नावं येतात. पण हे तरुण, नव्या दमाचे अभिनेते त्यांचे एक-दोन चित्रपट गाजले की गर्विष्ठ होतात असा टोमणा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने लगावला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत करणने या अभिनेत्यांवर निशाणा साधला आहे.

‘हा एक प्रकारचा आजारच आहे. बॉक्स ऑफीसवर तुमचे एक-दोन चित्रपट गाजले तर तुम्ही स्वत:ला सर्वांत यशस्वी कलाकार समजू लागता. मग पुढील चित्रपटांसाठी वाढवून मानधन मागू लागता. काही कलाकारांच्या मेकअपचाच खर्च दिवसाला एक लाख रुपये इतका असतो. अशी लोकं खरंच वेडी असतात. दोन चित्रपटांना यश काय मिळालं की त्यांच्यात फक्त ‘मी’पणाच शिल्लक राहतो. ते भ्रमात वावरत असतात,’ अशा शब्दांत करणने सुनावलं.

वाचा : अजय देवगणच्या ‘तानाजी’ चित्रपटाचे शीर्षक ‘तान्हाजी’ होणार?

करणने या मुलाखतीत सेलिब्रिटी व्यवस्थापकांनाही टोला लगावला आहे. ‘ही इंडस्ट्री कशी चालते हे काही सेलिब्रिटी व्यवस्थापकांना माहीतच नसतं. अभिनेत्यांचा एखादा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगला चालला, काही कार्यक्रम आणि लग्नात हजेरी लावली, तीन हजार लोकांच्या गर्दीत वावरू काय लागले की लगेच पुढच्या चित्रपटासाठी पाच कोटींनी मानधन वाढवतात,’ असं तो म्हणाला. मुलाखतीअखेर त्यांनी राजकुमार राव, आयुषमान खुराना आणि विकी कौशल या अभिनेत्यांची नावं घेतली.

राजकुमार, आयुषमान आणि विकी यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर गाजवलं. राजकुमारचा ‘स्त्री’, आयुषमानचा ‘अंधाधून’ आणि ‘बधाई हो’, विकी कौशलचा ‘राजी’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आता करणच्या अशा टिप्पणीवर हे अभिनेते काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.