मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपटांना एका वेगळेयाच उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या ‘सैराट’ या चित्रपटाने सर्वच विक्रम मोडित काढत प्रेक्षकांना ‘याड लावलं’ होत. त्यानंतर या चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक नागराज मंजुळेंवर कौतुकाचा वर्षाव झाला होता. विविध पुरस्कारांना गवसणी घालत या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आणि चित्रपटसृष्टीवर कायमची छाप सोडली आहे असेच म्हणावे लागेल. त्यामुळे सैराटची लोकप्रियता पाहता हिंदी भाषेतही या चित्रपटाचा रिमेक होणार असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत.

बॉलिवूडमध्ये प्रेमाची परिभाषा बदलणारा आणि प्रेक्षकांसमोर विविध चित्रपटांचा नजराणा सादर करणाऱ्या करण जोहरचे नाव ‘सैराट’च्या हिंदी रिमेकसोबत जोडले गेले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने ‘सैराट’ चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत. याविषयी करणतर्फे अद्यापही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, तरीही सध्या त्यासंबंधीच्या चर्चांना उधाण आले आहे. ‘सैराट’च्या हिंदी रिमेकमध्ये नवे चेहरे पाहण्याची संधी मिळू शकते. मात्र, चित्रपटाच्या मूळ कथानकात काहीही बदल केला जाणार नसल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता ‘परश्या’ आणि ‘आर्ची’च्या भूमिकेत कोण असेल, याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहणे सहाजिकच आहे.

दरम्यान, करण ‘सैराट’ चित्रपटाचा रिमेक करत असल्याच्या चर्चा रंगत असल्यामुळे त्याचा स्पेशल टच या चित्रपटाला मिळणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ‘सैराट’ चित्रपटाच्या कन्नड रिमेकच्या चित्रिकरणाला देखील सुरुवात झाली आहे. ‘सैराट’मध्ये आपल्या मराठी बोली भाषेने सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली आर्ची अर्थात रिंकु राजगुरु या चित्रपटातही आर्चीचीच भूमिका साकारत आहे. त्यामुळे आपल्या कन्नड भाषेने ही आर्ची प्रेक्षकांना वेड लावणार का? याचीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.

‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच महिने उलटूनही या चित्रपटाची जादू अद्यापही कायम आहे असेच म्हणावे लागेल. ‘सैराट’ चित्रपटामध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाला मिळालेले यश पाहता या चित्रपटातील सर्वच कलाकार प्रकाशझोतात आले आहेत.