आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मार्केटिंगचे सर्व फंडे वापरणारा आमिर बॉलिवुडमधील ‘मि. परफेक्शनिस्ट’.. त्यामुळेच त्याने चित्रपट साइन केल्यापासून ते तो प्रदर्शित होईपर्यंत प्रत्येक बाबीची प्रसिद्धी कशी होईल याकडे या परफेक्शनिस्टचे बारीक लक्ष असते. मात्र, याच आमिरला आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपटसाठी दोन वर्षे वाट पाहावी लागली होती. लौकिकार्थाने ‘कयामत से कयामत’तक हा आमिरचा पहिला चित्रपट. मात्र, त्याआधीही त्याने केतन मेहता यांचा ‘होली’ हा चित्रपट केला होता. परंतु या दोन चित्रपटांदरम्यान आमिरने आणखी एक चित्रपट केला होता, तो म्हणजे ‘सुबह सुबह’.. परंतु काही कारणास्तव हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नव्हता. आता ‘सुबह सुबह’ हा चित्रपट येत्या सोमवारी, ९ जून रोजी ‘अँड पिक्चर्स’वर दाखवण्यात येणार असून त्याच्या प्रसिद्धीची धुरा दस्तुरखुद्द करण जोहरने स्वतकडे घेतली आहे.
नवख्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला ‘सुबह सुबह’ हा चित्रपट आमिरच्या कारकिर्दीतला एकमेव अप्रदर्शित चित्रपट असल्याचे म्हटले जाते. ‘अँड पिक्चर्स’ या वाहिनीवर झळकणारा आमिरचा अप्रदर्शित चित्रपट म्हणजे हा ‘सुबह सुबह’च आहे की दुसराच कोणतातरी चित्रपट आहे याबद्दल आमिरने कमालीची गुप्तता ठेवली आहे. आमिरचा हा चित्रपट कधीचा आहे, या चित्रपटाचा दिग्दर्शक कोण, सहकलाकार कोण होते किंवा हा चित्रपट प्रदर्शित का होऊ शकला नाही, याबद्दल एकही गोष्ट बाहेर येणार नाही, याची काळजी आमिरने घेतली आहे. मात्र, हा चित्रपट आमिरचा फार जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणूनच टीव्हीवर तरी तो प्रदर्शित व्हावा, यासाठी त्याने खास प्रयत्न केले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
या चित्रपटाची प्रसारण, त्यादरम्यान आमिर खुद्द चाहत्यांचे फोन घेणार आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहे शिवाय ट्विटरवरही आमिर उपलब्ध असेल. हा सगळा सोहळा एका सूत्रात बांधण्याची जबाबदारी आमिरचा मित्र करण जोहरने आपल्या खांद्यावर घेतली आहे. सध्या आमिर आणि करण यांच्यात नव्याने मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. एवढेच नाही तर ‘शुध्दी’ या त्याच्या आगामी चित्रपटातून ह्रतिक बाहेर पडल्यानंतर आमिरने ही भूमिका करावी, यासाठी करण त्याच्या मागे लागला आहे. या सगळ्या पाश्र्वभूमीवर आमिरच्या या एकुलत्या एका अप्रदर्शित चित्रपटाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सूत्रसंचालकाची भूमिका करण निभावणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.