पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारताचा चीन विरुद्ध रक्तरंजित संघर्ष झाला. या संघर्षात भारताचे २० सैनिक शहिद झाले. परिणामी भारत-चीन संबंधात तणाव निर्माण झाला आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी देशवासीयांनी चिनी उत्पादनावर बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे. ‘बायकॉट चायना प्रोडक्ट’ या मोहिमेत सेलिब्रिटींनीही भाग घ्यावा अशी विनंती ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ CAIT या संस्थेने केली होती. या विनंतीला प्रतिसाद देत अभिनेता करणवीर बोहरा याने टिक-टॉक हे चिनी अ‍ॅप अनइन्स्टॉल केलं आहे.

करणने इन्स्टाग्रामवर आपल्या मोबाईलचे स्क्रीनशॉट शेअर करुन याबाबत चाहत्यांना माहिती दिली. “मला माहिती आहे आपण घरी बसून काहीही करु शकत नाही. परंतु आपल्या जवानांसाठी प्रार्थना मात्र करु शकतो. सीमेवर राहून देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या सुरक्षिततेसाठी आपण देवाकडे प्रार्थना करुया.” अशा आशयाची पोस्ट लिहून त्याने टिक-टॉक अ‍ॅप अनइन्स्टॉल केलं आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडिया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

भारत-चीन सीमेवर सुरु असणाऱ्या हिंसक घटनांमध्ये अनेकदा चीनकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा तिबेट प्रशासनाचे अध्यक्ष लोबसांग सांगे यांनी केला आहे. “चर्चेमधून प्रश्न सोडवणे हाच एकमेव मार्ग आहे. भारताला आपल्या प्रदेशाची आणि सर्वभौमत्वाचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. चीनचे धोरण हे काठीला लावलेल्या गाजराप्रमाणे आहे. (जेवढं आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करु तेवढं काठीला बांधलेलं गाजर लांब जाणार.) भारतानेही अशाच धोरणाचा अवलंब केला पाहिजे. मात्र भारताने घुसखोरीचा मार्ग निवडू नये,” अशी अपेक्षा सांगे यांनी व्यक्त केली.