युनीसेफच्या कार्यक्रमासाठी करिना कपूर- खान नुकतीच दिल्लीला गेली होती. या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना तिने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. युनिसेफच्या वतीने अनेक सार्वजनिक समस्यांविरोधात जागुकता निर्माण करण्याचे काम केले जाते. यावेळी करिनाने पती सैफ अली खान आणि मुलगा तैमुर यांच्या संबंधांवरही खुलेपणाने भाष्य केले. सैफबद्दल बोलताना करिना म्हणाली की, ‘मी फार नशीबवान आहे की मला सैफसारखा समजूतदार नवरा मिळाला.’

करिना पुढे म्हणाली की, ‘एक आई मुलासाठी जे काही करते ते वडील करु शकत नाहीत हे कितीही खरं असलं, तरी या गोष्टीकडे कानाडोळा करता येणार नाही की, जे बाबा मुलांसाठी करतात ते आई करु शकत नाही. तैमुरला माझ्यासोबत वेळ घालवायला फार आवडतं. पण मी त्याचे खूप लाड करते आणि त्याला बिघडवते आहे. पण सैफ मात्र त्याला क्रिकेटचे धडे देत आहे. आम्ही दोघंही त्याच्या पालन पोषणात समतोल राखण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा मी तैमुरपासून दूर असते तेव्हा सैफ तैमुरसोबत असतो.’

करिनाने यावेळी तिच्या गरोदरपणातील अनुभवाबद्दलही भाष्य करते. ‘माझ्या गरोदरपणात मला आई आणि बाळामधले नाते किती प्रेमळ असतं याचा अनुभव आला. तैमुरच्या जन्मानंतर डॉक्टर आणि परिचारिकांनी ज्यापद्धतीने मला सांभाळले मी त्यांची खरंच ऋणी आहे. माझा नवरा, संपूर्ण खान आणि कपूर कुटुंबिय तसेच माझे चाहते माझ्या पाठिशी ठामपणे उभे असल्यामुळे ते ९ महिने माझ्यासाठी अविस्मरणीय होते.’