बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या आयुष्यात घडत असलेल्या घटना सर्वांसमोर मांडताना दिसतात. या मादीतील एक अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची बेबो, अभिनेत्री करिना कपूर. करिनाने आतापर्यंत तिच्या प्रेग्नंसीपासून ते अफेअर पर्यंत प्रत्येक गोष्ट गर्वाने मिडियासमोर मांडली आहे. आज करिनाचा ३९ वा वाढदिवस आहे. करिना तिचा वाढदिवस मुलगा तैमूर आणि पती सैफसोबत साजरा करणार असल्याचे म्हटले जात आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त चला जाणून घेऊया करिनाच्या आयुष्यातील काही रंजन गोष्टी.

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानशी लग्न करण्याआधी करिनाचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्यांसोबत जोडण्यात आले होते. सैफआधी करिना दुसऱ्या एका खानला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. अनेकांना करिना शाहिद कपूरला डेट करत असल्याचे माहित असेल पण त्यापूर्वीही करिनाच्या आयुष्यात आणखी एक खानची एण्ट्री झाली होती.

करिना आणि अभिनेता हृतिक रोशनच्या नात्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कभी खूशी कभी गम’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हृतिक आणि करिना एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर दोघांनी ‘यादें’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘मैं प्रेम की दीवानी हूं’ या चित्रपटात काम केले. त्यांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री पाहून त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

२००४ मध्ये ‘फिदा’ चित्रपटाच्या सेटवर करिना आणि शाहिद कपूरची ओळख झाली. हळूहळू करिना आणि शाहिद एकमेकांना डेट करु लागले. त्यांचे डिनर डेटवर जाताना तसेच फिरतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु काही दिवसांमध्ये करिनाची ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर सैफ अली खानशी ओळख झाली. त्यामुळे करिना आणि शाहिदमध्ये वाद सुरु झाले आणि अखेर शाहिदने करिनासोबत असलेल्या नात्याला पूर्णविराम लावला असल्याचे म्हटले जात आहे.

करिना अभिनेता फरदीन खानलादेखील डेट करत असल्याचे म्हटले जात होते. मात्र या चर्चा फार काळ रंगल्या नाहीत. कारण करिनाचे नाव शाहिद कपूरसोबत जोडण्यात आले. अखेर करिनाने २०१२ मध्ये सैफशी लग्न केले. लग्नापूर्वी करिना आणि सैफ तीन वर्षे एकमेकांना डेट करत होते. आता करिना तिचा वाढदिवस कुठे आणि कोणासोबत साजरा करणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.