याआधी मैत्रीखातर खूप चित्रपट केले, परंतु आता चांगली कथा असलेले चित्रपटच करणार असल्याचे अभिनेत्री करिना कपूरने म्हटले आहे. याविषयी बोलताना ती म्हणाली, मित्रांसाठी खूप चित्रपट केले. आता मी चांगली कथा असलेले चित्रपटच स्विकारणार आहे. मित्रांसाठी चित्रपट केल्याचा मला खेद नाही. माझ्या मते ती कधीच चूक नव्हती. माझ्या मित्रांवर मी मनापासून प्रेम करते, त्यामुळे याचा मला फरक पडत नाही. माझ्यातील ताळमेळ राखण्यासाठी मी चमेली आणि देव हे चित्रपट केले. मी कपूर कुटुंबातून येत असल्याने चित्रपटसृष्टीत स्वत:ला सिद्ध करणे हे माझ्यासाठी गरजेचे होऊन बसते. चमेलीमधील वेश्येची भूमिका साकारताना मी केवळ २१ वर्षांची होते. तलाशमध्ये पुन्हा मी तशाच प्रकारची भूमिका साकारली… माझ्या आयुष्यातील हे देन्ही महान चित्रपट आहेत. वेगळ्या धाटणीचे चित्रपट करणार का, या विषयी बोलताना ती म्हणाली, नक्कीच मी अशाप्रकारचे चित्रपट करीन. व्यावसायिक चित्रपटात प्रतिथयश अभिनेत्री असताना मी देव, चमेली आणि ओंकारासारखे चित्रपट केले असल्याने, केवळ करायचे आहेत म्हणून मी अशाप्रकारचे चित्रपट करणार नाही. अशाप्रकारचे चित्रपट करायचेच आहेत म्हणून मी ते स्विकारणार नाही. तसा प्रयोग मी याआधी केला असून, व्यावसायिक चित्रपटात काम करण्यातदेखील मला आनंद मिळतो. आता मला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही, फक्त चित्रपटाची कथा चांगली हवी एव्हढेच माझे म्हणणे आहे.