बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खानची. ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. त्यात जेव्हा करीनाने तैमूरला जन्म दिला होता. तेव्हा त्यांच्या चाहत्यांसाठी ही सगळ्यात उत्साहाची बातमी होती. एवढंच नाही तर त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माने हा उत्साह काही कमी झालेला नाही. मात्र, करीनाच्या दुसऱ्या मुलाचा जन्म होऊन आता बराच काळ गेला आहे. तरी सुद्धा करीना आणि सैफने त्यांच्या बाळाचे नाव कोणाला सांगितले नाही किंवा त्या बाळाचा फोटो शेअर केलेला नाही. या सगळ्यामुळे करीनाचे चाहते निराश झाले आहेत.

करीना सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. बाळाला जन्म दिल्यानंतर करीनाने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये बाळ दिसत नसल्याने चाहते निराश झाले आहेत. कारण तिच्या चाहत्यांना तिच्या दुसऱ्या मुलाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. करीनाने सोशल मीडियावर फोटो शेअर केला की तिचे चाहते त्यात तिच्या बाळाचा फोटो किंवा त्याच्या बद्दल काही लिहले आहे का हे लगेच पाहतात. आता करीना तिच्या चाहत्यांची ही मागणी कधी पूर्ण करणार असा प्रश्न सगळ्यांसमोर आहे.

करीनाने २१ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. करीना लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दुसरीकडे सैफने नुकतंच आपल्या ‘भूत पुलिस’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. तो लवकरच ‘आदिपुरूष’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे.