इरफान खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर यांची मुख्य भूमिका असलेला ‘हिंदी मीडियम’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजला. भारत आणि चीन या दोन्ही देशात या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती. त्याचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीक्वलमध्ये अभिनेत्री करिना कपूर महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, करिना या चित्रपटात पोलीस अधिकारीच्या भूमिकात दिसणार आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी करिना खूप उत्सुक आहे. ‘हिंदी मीडियम २’ या चित्रपटाकडे प्रेक्षकांचंही लक्ष लागून राहिलं आहे. कारण इरफान खान या चित्रपटातून कमबॅक करत आहे. गेल्या बऱ्याच महिन्यांपासून लंडनमध्ये तो कर्करोगावर उपचार घेत आहे. एप्रिलमध्ये शूटिंगला सुरुवात होणार आहे.

या सीक्वलचं नाव तूर्तास ‘इंग्लिश मीडियम’ असं असल्याचं म्हटलं जात आहे. इरफान खानची मुलगी इंग्लंडमध्ये शिकण्यासाठी जाते आणि तिथे तिला शिक्षणासाठी येणाऱ्या समस्येवर या चित्रपटाची कथा आधारित आहे.

इरफानला कॅन्सरचे निदान होण्यापूर्वीच म्हणजेच, फेबु्रवारी २०१८ मध्ये ‘हिंदी मीडियम’च्या सिक्वलची घोषणा झाली होती. होमी अदजानिया हा चित्रपट दिग्दर्शित करणार असंही जाहीर करण्यात आलं होतं. पण इरफानच्या प्रकृतीमुळे हा चित्रपट लांबणीवर टाकण्यात आला होता.