पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा संबंध अमेरिकेतील वर्णद्वेषाशी जोडला जात आहे. परिणामी कृष्णवर्णीय लोकांनी प्रशासनाविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाला हॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच आता बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान अभिनेत्री करीना कपूरने देखील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी एक पोस्ट लिहिली होती. मात्र या पोस्टमुळे तिची खिल्ली उडवली जात आहे. नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

काय म्हणाली होती करीना कपूर?

“प्रत्येक रंग हा सुंदरच असतो. आपला जन्म जरी विविध ठिकाणी झाला असला, आपल्या रंगांमध्ये असमानता असली तरी देखील आपण सर्व समानच आहोत. समाजातील प्रत्येक व्यक्तीला स्वात्र्यंत, समानता आणि आदर मिळायलाच हवा. कृपया दृढ रहा. मला विश्वास आहे की हे सर्व लवकरच संपेल. सुरक्षित राहा.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट करीना कपूरने केली होती.

या पोस्टमध्ये तिने सर्व रंगांना समान म्हटलंय, तसेच वर्णद्वेषाविरुद्ध सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देखील दिलाय. पण वास्तविक रित्या ती खरंच सर्व रंगांना समान मानते का? की फक्त चर्चेत राहण्यासाठी अशा पोस्ट करतेय? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या चर्चांमागील मुख्य कारण म्हणजे तिने केलेल्या जाहिराती. त्वचेला गोरी करणाऱ्याचा दावा करणाऱ्या साबण आणि क्रिम्सच्या जाहिरातींमध्ये करीना झळकली आहे. असे कुठलेही साबण लावून त्वचेमधील मेलॅलिनचे प्रमाण कमी करुन गोरं होता येत नाही असं तज्ज्ञांनी वारंवार स्पष्ट केलंय. तरी देखील करीनासारख्या अभिनेत्री जाहिरातींमार्फत लोकांना खोटी आश्वासनं का देतात? असा प्रश्न नेटकऱ्यांनी करीना कपूरला विचारला आहे.

जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूमुळे अमेरिकेत वातावरण पेटलं आहे. लोक करोना विषाणूची पर्व न करता रस्त्यांवर येऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात घोषणा देत आहेत. या आंदोलनाला शकिरा, टेलर स्विफ्ट, मडोना, लेडी गागा यांसारख्या अनेक मोठ्या हॉलिवूड कलाकारांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच काही सेलिब्रिटींनी तर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला मतदानच करणार नाही अशी धमकीच द्यायला सुरुवात केली आहे.