अभिनेत्री करीना कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या किशोरवयातील एक किस्सा सांगितला. आई बबिता कपूर यांनी तिला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकण्याचा का निर्णय घेतला यामागचं कारणही तिने सांगितलं.
बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली, “मी १४-१५ वर्षांची होते. मला एक मुलगा खूप आवडायचा. आईवर एकल मातृत्वाची जबाबदारी असल्याने तिला माझी खूप जास्त काळजी होती. माझ्या सवयींना आणि वागणुकीला वैतागून तिने तिच्या रुममध्ये फोन ठेवला होता आणि त्या रुमला ती कुलूप लावून बाहेर जायची. एकेदिवशी आई बाहेर गेली असताना त्या मुलाला भेटण्यासाठी मी युक्ती लढवली. ज्या रुममध्ये आईने फोन ठेवला होता, मी त्या रुमचं कुलूप तोडलं. त्या मुलाला फोन करून भेटण्याचा प्लॅन केला आणि घरातून गुपचूप पळाले.” या प्रकरणानंतर बबिता यांनी करीनाला देहरादून इथल्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं.
करीनाने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं असून लवकरच ती दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. सैफ आणि करीनाला तैमुर हा मुलगा असून तो चार वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वीच करीनाने पुन्हा गरोदर असल्याची बातमी चाहत्यांना सांगितली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 20, 2020 9:10 am