कोणी म्हणते आहे तिला गर्व चढला आहे, कोणी म्हणते आहे कपूर खानदानातच गर्विष्ठपणा भरला आहे त्यामुळे तिच्यात तर तो ठासून आहे. ती आधीच ‘कपूर’ होती आता तर ती नवाबाची बेगम झाली आहे म्हणून तिचे नखरे वाढलेत. एक ना अनेक गोष्टी तिच्याबद्दल बोलल्या जात असल्या तरी बॉलीवूडची ‘बेबो’ करीना क पूर-खान आपल्या मतावर ठाम आहे. ‘सिंघम रिटर्न’मध्ये अजय देवगणची नायिका साकारणाऱ्या करीनाने यापुढेही आपण फक्त बडे कलाकार आणि बडे बॅनर असतील तरच काम करणार, असे जाहीर केले आहे.
गेल्या वर्षभरात करीनाने सहा चित्रपट नाकारल्याची चर्चा आहे. बरे, तिच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहे आणि ती ते नाकारत सुटली आहे, असेही नाही. जे चित्रपट हातात होते त्यांच्यावरही तिने पाणी सोडले आहे. हे सगळे कशासाठी? यावर आपल्याला फक्त व्यावसायिक चित्रपटच करायचे आहेत, असे तिने सांगितले. तिने करण जोहरच्या ‘शुध्दी’तून काढता पाय घेतला. झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’लाही तिने नकारघंटा वाजवली. आणि सुजॉय घोषचा ‘कहानी’ सिक्वलही तिने नाकारला. यातला एखादा चित्रपट नाकारला आणि तो खूप चालला म्हटल्यावर तिला थोडेसे वाईटही वाटते. पण, ठीक आहे.. कारिकर्दीच्या या टप्प्यावर केवळ मोठय़ा कलाकारांबरोबरच काम करायचे आहे, असे तिने स्पष्ट केले.
यशस्वी अभिनेत्री बनण्यासाठी नायिकाप्रधानच चित्रपट करणे गरजेचे आहे, असे आपल्याला अजिबात वाटत नसल्याचे तिचे म्हणणे आहे. बहुधा, मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘हिरॉईन’चे अपयश ती विसरली नसावी. सलमानबरोबरचा ‘बॉडीगार्ड’, अजयबरोबर ‘गोलमाल ३’ असे जे चित्रपट मी केले तेच जास्त चालले. आणि त्या प्रत्येक चित्रपटात माझ्या व्यक्तिरेखेला महत्व होते. हॉलीवूडमध्येही ‘बॉर्न सुप्रिमसी’, ‘जेम्स बाँड’सारख्या अ‍ॅक्शन चित्रपटांमधून तिथल्या नायिकांना काही करण्यासारखे नसतेच. पण, तरीही अँजेलिना जोलीसारख्या हॉलीवूडमधील आघाडीच्या तारका अशाप्रकारच्या व्यावसायिक चित्रपटांमधूनच काम करतात. त्यामुळे तद्दन व्यावसायिक चित्रपटांमध्ये नायिकेला करण्यासारखे काही नसते, या म्हणण्यात काही तथ्य नाही. उलट, मोठय़ा कलाकाराची नायिका होण्यासाठीच जास्त ग्लॅमर, संयम आणि गुणवत्तेची गरज असते.. असे करीना खूप काही बडबडून गेली आहे. सध्या तरी ‘सिंघम रिटर्न’मध्ये ती एका मराठी तरुणीच्या भूमिकेत आहे. चित्रपटात तिची भूमिको ही केशरचनाकाराची आहे, तिचे स्वत:चे पार्लर आहे. आणि या भूमिकेसाठी तिने सेटवरच येता जाता मराठी शिकून घेतले असून त्याचा यथेच्छ वापर करून चित्रपटात तिने छान मराठीत शिव्याही दिल्या असल्याची माहिती तिने दिली आहे.