अभिनेत्री करिना कपूर चित्रपटांमध्ये कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे. तिचा आगामी ‘वीरे दी वेडिंग’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तिच्याकडे इतरही बरेच प्रोजेक्ट्स असून आता मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये ती झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा मराठी चित्रपट म्हणजे नाना पाटेकरांचा ‘आपला मानूस’. प्रेक्षक-समीक्षकांकडून दाद मिळालेल्या या चित्रपटाचा हिंदी रिमेक करिनाच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर नाना पाटेकरांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. मराठी चित्रपटात नाना पाटेकरांसोबतच सुमित राघवन आणि इरावती हर्षे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. बॉक्स ऑफीसवर ‘आपला मानूस’ने चांगली कमाई केली असून अनेकांनीच त्याची स्तुती केली. त्यामुळे याचा हिंदी रिमेक करिनाच्या करिअरमधला महत्त्वाचा चित्रपट ठरू शकतो, असं म्हटलं जात आहे.

 

ashutosh-gowarikar
आशुतोष गोवारीकर

PHOTOS : सईचा लक्षवेधी रॅम्पवॉक

करिनाचा आगामी ‘वीरे दी वेडिंग’ १ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सोनम कपूर, सुमित व्यास, स्वरा भास्कर यांच्याही भूमिका आहेत. तर आशुतोष गोवारीकर आगामी ‘पानिपत’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाला सुरुवात करणार आहेत. त्यानंतर ‘आपला मानूस’च्या रिमेकची तयारी सुरू होणार आहे.