विविधांगी भूमिकांना न्याय देणाऱ्या करिनाने बॉलिवूडमध्ये स्वत: च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. २०१२ मध्ये तिने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. मात्र सैफपूर्वी करिना एका राजकीय व्यक्तीमत्वाच्या प्रेमात होती असं समोर आलं आहे. पत्रकार राशिद किदवई यांनी’ नेता अभिनेता : बॉलिवूड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स’  या पुस्तकामध्ये याविषयी लिहीलं आहे.

‘टाईम्स नाऊ’नुसार, सैफशी लग्न करण्यापूर्वी करिनाने फरदीन खानला डेट केलं होतं. इतकचं नाही तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे तिचं क्रश होतं असं तिने २००२ मध्ये कबूल केलं होतं. तर राहुल गांधीदेखील करिनाचा प्रत्येक चित्रपट हा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहत असे, असं राशिद यांनी त्यांच्या पुस्तकात लिहीलं आहे.

सिमी गरेवालच्या टॉक शोमध्ये सहभाग घेतलेल्या करिनाला काही वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी तुला कोणत्या व्यक्तीला डेट करायला आवडेल असा प्रश्न सिमीने करिनाला विचारला होता. यावर करिनाने राहुल गांधी यांचं नाव घेतलं होतं, असं या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे.

‘मी राहुल गांधीना तसं फारसं ओळखत नाही. ते एक राजकारणी आहेत हीच माझ्यासाठी त्यांची ओळख आहे. मला माझ्या कुटुंबाकडून कलेचा वारसा मिळाला आहे. तर राहुल गांधींना राजकारणाचा त्यामुळे आमची भेट झाली तर नक्कीच चांगल्या गप्पा रंगतील. त्यामुळे त्यांना डेट करायला आवडेल’, असं ती म्हणाली होती.

दरम्यान, सिमीच्या टॉक शोमध्ये हे वक्तव्य केल्यानंतर २००९ मध्ये करिनाने तिचं विधान मागे घेतल्याचं पाहायला मिळालं. ‘गांधी आणि कपूर ही दोन्ही घराणी नावाजलेली आहेत. त्यामुळे टॉक शोमध्ये असं म्हणाले होते. मात्र माझ्या मनात तसं अजिबात नाही. पण कधी संधी मिळाली तर त्यांचं आगत्य करायला मला नक्कीच आवडेल. विशेष म्हणजे ते देशाचं पंतप्रधान झाले तर मला जास्त आनंद होईल, पण म्हणून त्यांना डेट करणं मला आवडेल असं मी कधीच म्हणणार नाही’, असं स्पष्टीकरण तिने दिलं.