पाकिस्तानी दहशतवाद, भारतात पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या घातपाती कारवाया यावर आधारित असलेला ‘सरफरोश’ या चित्रपटाला नुकतीच २० वर्ष पूर्ण झाली. ३० एप्रिल १९९९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात आमिर खान आणि सोनाली बेंद्रे हे मुख्य भूमिकेत झळकले होते. विशेष म्हणजे या चित्रपटाशी अनेक व्यक्तींच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. या चित्रपटाशी कारगिल युद्धात आपला एक पाय गमावलेले मेजर डी.पी.सिंह यांच्यादेखील काही आठवणी जोडल्या गेल्या असून त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांची ही पोस्ट पाहून अभिनेता आमिर खानदेखील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

मेजर डी.पी.सिंह यांनी तब्बल २० वर्षांनंतर आमिरचा ‘सरफरोश’ हा चित्रपट पुन्हा एकदा पाहिला आणि आपल्या आठवणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा दिला. “२ ० वर्षांपूर्वी मी आमिर खानचा ‘सरफरोश’ पाहिला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा पाहण्याचा योग आला. त्यावेळी मी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिला होता. आज तो टिव्हीवर पाहत आहे. मात्र या साऱ्यामध्ये आज एक फरक आहे. ज्यावेळी मी पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तेव्हा माझे दोन्ही पाय शाबूत होते. ऑपरेशन विजय युनिट जॉइन करण्यापूर्वी मी हा चित्रपट पाहिला होता. त्यानंतर आज हा चित्रपट पुन्हा पाहताना माझा एकच पाय आहे. ‘सरफरोश’ हा शेवटचा चित्रपट आहे जो पाहताना माझे दोन्ही पाय होते”, अशी भावनिक पोस्ट डी.पी.सिंह यांनी केली.

डी.पी. सिंह यांची पोस्ट वाचल्यानंतर आमिर प्रचंड भावूक झाला आणि त्यानेदेखील तात्काळ मेजर डी.पी.सिंह यांना रिट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “प्रिय मेजर डी.पी.सिंह, तुमची ही पोस्ट पाहून माझ्या अंगावर शहारे आले, मी प्रचंड भारावून गेलोय. तुमचं शौर्य, हिंमत आणि प्रतिकुल परिरस्थितीमध्ये मोठ्या धीराने सामोरे जाण्याच्या वृत्तीला मी मनापासून सलाम करतो”, असं आमिर म्हणाला.

दरम्यान, भारतीय सैन्य दलाने आजवर बरीच युद्ध लढली. या युद्धांपैकी कायम अग्रस्थानी राहिले ते युद्ध म्हणजे कारगिल युद्ध. जवळपास २० वर्षांपूर्वी म्हणजे १९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यादरम्यान कारगिल युद्ध झालं. ज्यानंतर या दोन्ही देशांमध्ये असणारी सर्वच समीकरणं बदलून गेली होती. सैन्यदलात सेवेत असणाऱ्या बऱ्याच जवानांनी या युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली होती. या युद्धातील वीर मेजर डी.पी. सिंह यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला.