२१व्या ‘कारगिल विजय दिना’निमित्त गायिका लता मंगेशकर यांनी कारगिल युद्धात अतुलनिय शौर्य गाजवलेल्या सर्व जवानांच्या धैर्याला आणि पराक्रमाला सलाम केला आहे. त्यांनी स्वत: गायलेलं ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणं ट्विट करुन भारतीय लष्कराचं कौतुक केलं आहे. आजचा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि जनतेचं संरक्षण करणाऱ्या शूरवीर जवानांची आठवण करून देतो. कारगिल युद्धाला आज २१ वर्षे झाली. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला होता. त्यामुळे या दिवशी ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात येतो.

“आज ‘कारगिल दिना’निमित्त माझ्या देशातील सर्व शूर सैनिकांना मी प्रणाम करते.” अशा आशयाचं ट्विट करुन लता मंगेशकर यांनी भारतीय लष्कराला सलाम केला. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट केलं. यामध्ये त्यांनी स्वत: गायलेलं ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारत आणि पाकिस्तानमध्ये जुलै १९९९ मध्ये कारगिल युद्ध झाले होते. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेचं उल्लंघन करून भारतात घुसखोरी केली होती. त्यावेळी समुद्र सपाटीपासून १८ हजार फूट उंची आणि बर्फाळ प्रदेश अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्यानं धाडसानं शत्रूवर विजय मिळवला होता. ८ मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. २६ जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चाललं. अखेरच्या श्वासापर्यंत धैर्यानं लढा देत भारतीय सैन्यानं कारगिल युद्ध जिंकलं.