14 December 2019

News Flash

”’बिग बॉस १३’वर बंदी आणा”; करणी सेनेचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

'बिग बॉस' या शोसोबतच सलमान खानवरही कारवाईची मागणी

सलमान खान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस १३’ या रिअॅलिटी शोवर तातडीने बंदी आणण्याची मागणी करणी सेनेने केली आहे. हा शो हिंदू संस्कृतीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रसुद्धा लिहिलं आहे. ‘बिग बॉस’चं तेरावं पर्व सध्या जोरदार चर्चेत असून सोशल मीडियावरही #BanBiggBoss हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. या तेराव्या पर्वात शोच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत आणि हे नियम प्रेक्षकांना रुचले नाहीत.

‘बिग बॉस १३’मध्ये BFF (बेस्ट फ्रेंड्स फॉरेव्हर) ही नवीन संकल्पना मांडण्यात आली. यानुसार स्पर्धकांना त्यांच्या जोड्या सुरुवातीला निवडण्यास सांगितल्या. संपूर्ण सिझनमध्ये संबंधित जोड्या एकाच बेडवर झोपणार आहेत. यामध्ये काही महिला स्पर्धकांनी पुरुष स्पर्धकाला जोडीदार म्हणून निवडलं. त्यामुळे महिला व पुरुषाने एकाच बेडवर झोपणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारत काही प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. शोमध्ये दाखवण्यात येणाऱ्या सीनवर आक्षेप घेत प्रेक्षकांनी सोशल मीडियावर #BoycottBiggBoss हा हॅशटॅग वापरत विरोध केला आहे.

या शोचे शूटिंग मुंबईतील गोरेगाव येथे होत असल्याने करणी सेनेनं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित हिंदू कायद्यानुसार त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या शोसोबतच सूत्रसंचालक सलमान खानवरही कारवाई करण्यात यावी, कारण शोच्या माध्यमातून लव्ह-जिहाद पसरवण्यात व हिंदू संस्कृतीची प्रतिमा मलिन करण्यात त्याचाही मोठा वाटा आहे, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनेही मंगळवारी या शोवर बंदी आणण्याची मागणी केली होती. ‘बिग बॉस’ हा शो अशाप्रकारे वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी या शोचे सिझन वादाच्या भोवऱ्यात होते.

First Published on October 10, 2019 11:09 am

Web Title: karni sena demands ban on bigg boss 13 writes a letter to cm devendra fadnavis ssv 92
Just Now!
X