संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित व्हायला आता केवळ दोन दिवस उरले आहेत. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना सिनेमासाठीचा वाद जास्तच चिघळताना दिसत आहे. गुरुग्राममध्ये सिनेमाला विरोध केल्यानंतर करणी सेनेचे कार्यकर्ते नोएडा डीएनडी टोल बूथकडे येथे पोहोचले. तिथे कार्यकर्त्यांनी लोकांना मारहाण करुन पोलिसांसमोरच सिनेमाच्या विरोधात प्रदर्शन सुरू ठेवले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा येथील डीएनडी परिसरात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेला मारहाण करायला सुरूवात केली. कार्यकर्त्यांनी विरोधाच्या नावाखाली डीएनडी परिसरात तोडफोड करायला सुरूवात केली. हा सर्व प्रकार पोलिसांसमोरच चालत असताना कार्यकर्त्यांवर कोणतीही कार्यवाई करण्यात आली नाही. या संबंधी आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसून लवकरच करणी सेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असे नोएडा पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. नोएडातील या मारपीटीआधी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूग्राममध्येही ‘पद्मावत’ सिनेमाला विरोध म्हणून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले होते.

हा मारहाणीचा प्रकार फक्त गुरुग्राम आणि नोएडामध्येच झाला असे नाही तर गुजरातमधील एका मल्टीप्लेक्समध्येही तोडफोड करण्यात आली असून फरीदाबाद येथील एका मॉलमध्ये आगही लावण्यात आली होती. याशिवाय गुजरातमधील मेहसाण येथे सेनेच्या कार्यकर्त्यांनी बस जाळण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व प्रकारामुळेच गुजरात थिएटर असोसिएशनने राज्यात ‘पद्मावत’ सिनेमाचे स्क्रिनिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सिनेमाला प्रदर्शनासाठीचा हिरवा कंदीला दिला असला तरी गुजरात आणि राजस्थानमध्ये सिनेमाच्या स्क्रिनिंगवर थिएटर मालकांनी बंदी घातली आहे.