‘द ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन’ने (बीबीएफसी) काल संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटाला प्रदर्शनासाठी हिरवा कंदील दाखवला. यानंतर बीबीएफसीच्या निर्णयामुळे रागावलेल्या करणी सेनेने युकेतील चित्रपटगृहे जाळण्याची धमकी दिली आहे.

PHOTOS : आणखी एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकली

‘बीबीएफसी’ने चित्रपटातील एकाही दृश्याला कात्री न लावता ‘१२ ए’ रेटिंग दिल्याचे काल जाहीर केले. या प्रमाणपत्रामध्ये चित्रपटाच्या सारांशात ‘पद्मावती’ हा हिंदी भाषिक चित्रपट असून, राजपूत राणीला मिळवण्यासाठी एक सुलतान त्यांच्या राज्यावर कशाप्रकारे आक्रमण करतो याचे ऐतिहासिक कथानक असल्याचे लिहिले आहे. त्यामुळे करणी सेनेचे नेते सुखदेव सिंह यांनी ‘पद्मावती’ चित्रपट दाखवणारी युकेतील चित्रपटगृहे जाळण्याची धमकी दिली आहे. ‘मला स्वतः तेथे जाऊन चित्रपटाला निषेध करण्याची इच्छा होती. मात्र, भारत सरकाराने माझा पासपोर्ट जप्त केलाय. त्यामुळे तेथे असणाऱ्या राजपूत समाजाला मी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी निषेध करण्याची विनंती करणार आहे. ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ’, असेही सिंह म्हणाले.

वाचा : अनुष्का-साक्षी धोनीमधील कनेक्शन माहितीये का?

दरम्यान, जोपर्यंत भारतातील सेन्सॉर बोर्ड ‘पद्मावती’ला परवानगी देत नाही तोपर्यंत देशाबाहेर चित्रपट प्रदर्शित करण्याचा आमचा कोणताही विचार नसल्याचे ‘वायकॉम १८’ने म्हटले आहे. संजय लीला भन्साळी आणि वायकॉम १८ संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती करत आहे.