अभिनेत्री कंगना रणौतने आमच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला तर तिचं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू अशी धमकी करणी सेनेनं दिली आहे. कंगनाच्या बहुचर्चित ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटावर करणी सेनेने आक्षेप घेत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. कंगनाने ही धमकी धुडकावून लावली होती. मी सुद्धा राजपूत आहे आणि असल्या विरोधांना घाबरणार नसल्याचं तिने म्हटलं होतं. कंगनाच्या या वक्तव्यानंतर शनिवारी करणी सेनेने पुन्हा धमकी दिली आहे.

‘कंगनाने आमच्या कार्यकर्त्यांविरोधात जाण्याचा प्रयत्न केला तर तिला महाराष्ट्रात फिरकू देणार नाही. तिच्या चित्रपटांचे सेट जाळून टाकू,’ अशी धमकी महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंग सेनगर यांनी दिली आहे. पुढील आठवड्यात २५ जानेवारी रोजी ‘मणिकर्णिका’ प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर आधारीत आहे. या चित्रपटात राणी आणि एका इंग्रज अधिकाऱ्यामध्ये प्रेम प्रकरण दाखवले असल्याचा आक्षेप करणी सेनेने घेतला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी हा चित्रपट आम्हाला दाखवण्यात यावा अशी मागणी करणी सेनेने केली आहे. अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा करणी सेनेने दिला आहे.

‘मणिकर्णिका’ हा चित्रपट चार इतिहासकारांना दाखवला आहे. त्याशिवाय सेन्सॉर बोर्डानेदेखील चित्रपटाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे विरोध झाल्यास त्याला न घाबरता चित्रपट प्रदर्शित करण्याचे कंगणाने ठरवले आहे.

मागील वर्षी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटावर करणी सेनेने आक्षेप घेतले होते. त्यावेळी करणी सेनेच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते.