संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ सिनेमाचा वाद अजूनही थांबायचे नाव घेत नाही. करणी सेना अजूनही सिनेमाला विरोध करत आहे. सोमवारी करणी सेनेने ‘पद्मावत’ सिनेमा पाहण्यास संमती दर्शवली होती. पण मंगळवारी त्यांनी हा सिनेमा पाहण्यास स्पष्ट नकार दिला. करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कालवी यांनी म्हटले की, ”पद्मावत’ सिनेमा आम्ही पाहणार नसून शेवटपर्यंत या सिनेमाला विरोध करु.’ कालवी यांनी चित्रपटगृहांच्या मालकांना हा सिनेमा प्रदर्शित न करण्याचे आवाहन केले आहे.

सोमवारी भन्साळी यांना सेनेच्या कार्यकर्त्यांना सिनेमा पाहण्यासाठी आमंत्रण दिले होते. यावर उत्तर म्हणून कालवी म्हणाले की, ‘भन्साळी यांनी पाठवलेल्या पत्रात सिनेमा कधी आणि कुठे दाखवला जाणार याबद्दल काही उल्लेख केला गेला नव्हता. तसेच अशापद्धतीने सिनेमा पाहण्यासाठी पत्र पाठवणं हे भन्साळी यांचे फक्त नाटक आहे.’ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मध्यस्थीनंतर लोकेंद्र यांनी सिनेमा पाहण्याचे मान्य केले होते. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. २४ जानेवारीला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.

राजपूत संघटनांनंतर राजस्थानमधील हिंदू संघटनांनीही या सिनेमाचा विरोध करण्यास सुरूवात केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी सरकारकडे या सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. कोणत्याही परिस्थिती तोगडिया हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असे ते म्हणाले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी हिरवा कंदिल दिला आहे. आता राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्येही हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. सिनेमाच्या बाजूने कौल देताना न्यायालयाने स्पष्ट केले की, सिनेमा ऐतिहासिक घटनांवर आधारीत नाही, तसेच अराजक तत्त्वांना प्रोत्साहन दिले जाऊ शकत नाही. राज्य सरकारांनाही या आदेशाचे पालन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.