करोना विषाणूचं संकट टळावं यासाठी देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. सध्या देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु असून गेल्या कित्येक दिवसांपासून देशातील नागरिक घरातच अडकले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक जण पुन्हा एकदा सारं काही सुरळीत सुरु व्हावं याची वाट पाहत आहे. यातच अभिनेता कार्तिक आर्यनदेखील प्रचंड कंटाळला असून त्याने सोशल मीडियावर केलेली कमेंट साऱ्यांच लक्ष वेधत आहे.

सध्या घरात राहून प्रत्येक सेलिब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. यात कार्तिकदेखील सतत त्याचे फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असतो. अलिकडेच त्याने त्याचा एक फोटो शेअर केला होता. मात्र या फोटोपेक्षा त्याच्या कॅप्शनची आणि त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्सची जास्त चर्चा रंगली.

 

View this post on Instagram

 

Felt cute won’t delete later

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

”क्यूट दिसत होतो. पण कदाचित डिलीट करु शकतो”, असं कॅप्शन कार्तिकने या फोटोला दिलं. त्याचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांसह कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला. यात कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनीदेखील कमेंट केली.

शानू शर्माने कार्तिकच्या फोटोवर हसण्याची इमोजी शेअर केले होते. ते पाहून कार्तिकने “मॅडम कलाविश्व पुन्हा कधी सुरु होणार आहे”, असा प्रश्न विचारला. त्याचा प्रश्न पाहून अनेकांना हसू आवरलं नाही. घरात बसून कार्तिक किती कंटाळला आहे, याचा अंदाज त्याच्या या कमेंटवरुन साऱ्यांच्याच लक्षात आला. दरम्यान, कार्तिक लवकरच ‘दोस्ताना 2 ‘आणि ‘भूलभुलैय्या 2’ या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र लॉकडाउनमुळे त्याचे हे दोन्ही चित्रपट रखडले आहेत.