करोना विषाणूशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. देशभरातील शेकडो लोकांनी आपल्या आर्थिक क्षमतेनुसार ‘पंतप्रधान मदत निधी’साठी पैसे देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने एक कोटी रुपयांची मदत केली आहे.

कार्तिकने ट्विट करुन त्याने एक कोटी रुपये दिल्याची माहिती दिली. “करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या अशा प्रतिकूल परिस्थितीत आज आपण एकमेकांची मदत करायला हवी. मी आज जो कोणी आहे ते देशवासीयांच्या प्रेमामुळेच. आज मी जे काही थोडे फार पैसे कमावले ते देखील देशवासीयांमुळेच. आज मी एक कोटी रुपये ‘पंतप्रधान मदत निधीमध्ये दान करत आहे.” अशा आशयाचे ट्विट करुन कार्तिकने देशवासीयांना मदतीचे आवाहन केले आहे.

कार्तिक आर्यनचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कार्तिकच्या चाहत्यांनी या मदतीसाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

यापूर्वी अक्षय कुमारने २५ कोटी, टीसिरीजचे मालक भूषण कुमार यांनी ११ कोटी, अभिनेत्री हेमा मालिनी यांनी १ कोटी रुपये, रजनीकांत यांनी ५० लाख, सनी देओलने ५० लाख, कपिल शर्मानं ५० लाख रुपयांची मदत दिली आहे.