छोट्या पडद्यावरील ‘कसौटी जिंदगी की २’ ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. कोमोलिका, प्रेरणा आणि अनुराग यांच्यानंतर आता या मालिकेमध्ये बहुप्रतिक्षीत ठरलेल्या मिस्टर बजाज यांची एण्ट्री होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मिस्टर बजाज यांच्या भूमिकेत नक्की कोणत्या कलाकाराची वर्णी लागेल यावरुन चर्चा सुरु होती. मात्र आता या भूमिकेवरील पडदा दूर सारण्यात आला आहे.
‘पिंकव्हिला’च्या माहितीनुसार, मिस्टर बजाज यांची भूमिका अभिनेता करणसिंह ग्रोवर वठविणार आहे. ‘कसौटी जिंदगी की २’ मध्ये रोनित रॉय यांनी मिस्टर बजाज ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्यानंतर आता या मालिकेच्या दुसऱ्या भागात करणसिंह ग्रोवरची वर्णी लागल्याचं सांगण्यात येत आहे.
एकता कपूरने मिस्टर बजाज यांच्या भूमिकेसाठी करणला विचारणा केली असून त्याने त्याचा होकार कळविला आहे. येत्या १७ मे पासून या मालिकेच्या पुढील भागाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे गेल्या कित्येक काळापासून लांब असलेला करण या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. यापूर्वी करणने ‘दिल मिल गए’ आणि ‘कुबूल है’ या दोन सुपरहिट मालिकांमध्ये काम केलं आहे.
दरम्यान, मिस्टर बजाज या भूमिकेसाठी समीर कोचर, एजाज खान, इक्बाल खान या नावांचीदेखील जोरदार चर्चा सुरु होती. मात्र अखेर करणसिंह ग्रोवरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 16, 2019 1:51 pm