विविध भाषांमध्ये सर्वाधिक गीतांच्या गायनाचा जागतिक विक्रम करणाऱ्या ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले यांच्या स्वरातील काश्मिरी गीतांना ‘सुवर्ण’ झळाळी लाभली आहे. आशाताईंचा स्वर लाभलेली पन्नास वर्षांपूर्वीची दोन गीते बुधवारी रसिकांसाठी खुली झाली आणि महाराष्ट्राचे काश्मीरशी असलेले सुरांचे नाते दृढ झाले.

आशा भोसले यांचा गुरुवारी (८ सप्टेंबर) ८४ वा वाढदिवस. हे औचित्य साधून आशाताईंनी गायलेल्या या काश्मिरी गीतांच्या सीडीचे प्रकाशन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. या गीतांचे ध्वनिमुद्रण होत असताना रेडिओ काश्मीर येथे निर्माते असलेले ज्येष्ठ साहित्यिक प्राणकिशोर कौल यांनी गीतांच्या आठवणींना उजाळा दिला. ही सीडी प्रकाशात आणणारे सरहद म्युझिकचे संजय नहार या वेळी उपस्थित होते. सरहद म्युझिकचे ख्वाजा सय्यद यांनी आशाताईंना ही सीडी भेट दिली. जुनी आणि दुर्मीळ गाणी ऐकून भारावलेल्या आशाताईंनी वाढदिवसाची ही भेट आनंददायी आहे, अशा भावना व्यक्त केल्या असल्याचे सुधीर गाडगीळ यांनी सांगितले. ५०वर्षांपूर्वीची ही गीते कुठेही उपलब्ध नव्हती. दोन वर्षांपूर्वी तेथे आलेल्या पुरानंतर रेडिओ काश्मीर येथून जी. आर. अखून यांच्या मदतीने ही गीते मिळविली आणि ती सीडी स्वरूपात आणली असल्याचे संजय नहार यांनी सांगितले.

कौल म्हणाले,‘ आशाजी काश्मीरच्या निसर्गसुंदर वातावरणाचा आनंद घेण्याकरिता १९६६ मध्ये आल्या होत्या. रेडिओ काश्मीर येथे काम करत असलेल्या  सर्वाचीच त्यांची मुलाखत मिळविण्याची आणि शक्य झाल्यास त्यांच्याकडून काश्मिरी गाणं गाऊन घेण्याची इच्छा होती. या प्रस्तावाला संमती देत ध्वनिमुद्रणासाठी रेडिओ केंद्रामध्ये येण्याची तयारी त्यांनी दर्शविली. संगीत विभागाचे प्रमुख कैसर कलंदर यांना आशाजींनी गाण्याचे शब्द उच्चारांसहित ऐकवायला सांगितले आणि ते त्यांनी हातांनी मराठीत लिहून घेतले. त्यानंतर त्या स्टुडिओत हजर झाल्या. काश्मिरी शब्दोच्चार आणि त्यातले आघात केवळ काही वेळातच आत्मसात केले. ध्वनिमुद्रण पूर्ण झाल्यावर मानधनाचा धनादेश त्यांनी सर्व वादकांमध्ये वाटून देण्याची विनंती केली. त्यानंतर काही काळाने पुन्हा काश्मीरला आल्यानंतर त्यांनीगाणं गाण्याची इच्छा प्रदíशत केली’’.