काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. त्यामुळे तिथे सतत पर्यटकांची वर्दळ असते. काश्मीरचे सौंदर्य जसे साद घालते. तसेच तिथली दुसरी बाजूही व्यथित करणारी ठरते. सीमेपलिकडून होणाऱ्या कारवाया, दहशतवादी हल्ले, गोळीबार आणि संचारबंदी… त्यामुळे काश्मीरी माणसाचे जगणे सातत्याने कोलमडून जाताना दिसते. काश्मीरमधील प्रश्न अनेकांनी पडद्यावर मांडले. त्याचीच पुढची कडी म्हणजे काश्मीरियत! काश्मीरमधील जीवन या नव्या शॉर्ट फिल्ममधून बघायला मिळणार असून, त्याचे पोस्टर रिलिज झाले आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे शॉर्ट फिल्म बाबतची माहिती दिली आहे. १२ ऑगस्ट रोजी ‘काश्मीरियत’ ही शॉर्ट फिल्म यूट्यूबवर प्रदर्शित होणार आहे. या फिल्ममध्ये अभिनेत्री जरीना वहाब मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच फिल्मचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या शॉर्ट फिल्मचे पोस्ट पाहता जरीना वहाब या थोड्या काळजीत असल्याचे दिसत आहे.

तरण आदर्श यांनी ट्विट करत ‘दिव्यांश पंडित यांची आगामी शॉर्ट फिल्म काश्मीरियतचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. फिल्ममध्ये जरीना वहाब काम करणार आहेत. १२ ऑगस्ट रोजी ही फिल्म प्रदर्शित होणार आहे. ही फिल्म Wild Buffaloes Entertainment द्वारे रिलिज करण्यात येणार आहे’ असे म्हटले आहे.

‘काश्मीरियत’ ही शॉर्ट फिल्म काश्मीरमधील कोणत्या मुद्द्यावर आधारित असणार आहे हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असल्याचे पाहायला मिळते.