नीरव मोदी हे नाव कालपासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ज्वेलर व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध असणारा हा व्यक्ती पंजाब नॅशनल बँकेला ११,४०० कोटीहून जास्त रकमेचा गंडा घातल्यामुळे सीबीआय त्याच्या मागावर आहे. नुकतेच त्याने देशातून पलायन केले असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. आभूषणांची रचना करणारा हा व्यक्ती प्रतिष्ठित अभिनेत्रींच्या दागिन्यांची रचना करण्यासाठी प्रसिद्ध होता. आता या अभिनेत्री कोण आहेत, ज्या नीरव मोदीने तयार केलेले दागिने घालत होत्या? तर त्या आहेत बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड अभिनेत्री केट विन्स्लेट.

वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाण्यासाठी किंवा इतर काही ठिकाणी स्वत:ला सादर करण्यासाठी अभिनेत्री कायमच किमती दागिन्यांचा वापर करतात. तर प्रियांका आणि केट या अभिनेत्री नीरवने तयार केलेले दागिने वापरणे पसंत करायच्या. १८ वर्षांपूर्वी नीरवने भारतात हिरे व्यापारात प्रवेश केला. २००८ मध्ये नीरव मोदीला त्याच्या एका मित्राने हिऱ्याचे इयरिंग तयार करण्याचा सल्ला दिला. हा सल्ला मनावर घेत नीरव मोदीने फायरस्टार डायमंड ही कंपनी स्थापन केली. २०१६ मध्ये फोर्ब्सच्या श्रीमंत तरुणांच्या यादीत त्याचा समावेश होता. नीरव मोदीच्या कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. तर दिल्ली, लंडन, न्यूयॉर्क, लास व्हेगास, सिंगापूर, मकाव, बिजिंग या देशांमध्ये त्याच्या कंपनीच्या शाखा आहेत. प्रियांका चोप्राने त्याच्या कंपनीची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणूनही काम केले आहे. याशिवाय २०१६ मध्ये ऑस्कर पुरस्काराच्या वेळी केट विन्स्लेटने नीरव मोदीने डिझाईन केलेले दागिने घातले होते.

नीरव मोदीची संपत्ती १.७३ अब्ज डॉलर इतकी आहे. नीरव मोदीविरोधात बँकेने गेल्याच महिन्यात २८० कोटी रुपयांच्या फसवणुकीसंदर्भात तक्रार दाखल केली होती. याच प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल करत चौकशीला सुरुवात केली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांनी आपल्या परदेशातील शाखांमधून नीरव मोदी व त्यांच्या कंपन्यांना कर्जउभारणीसाठी बनावट हमीपत्रे जारी करवून घेतली. मात्र त्याविषयी बँकेच्या यंत्रणेत कोणतीच नोंद झाली नव्हती. या संशयाच्या आधारेच बँकेने या कंपन्यांविरोधात पहिली तक्रार दिली होती.