नाटक हे माझ्यासाठी एक अभिनेता म्हणून एक कलाकाराचं जगणं आहे. आम्ही जेव्हा नाटक करतो. त्या बंदिस्त सभागृहात जेव्हा एखादी भूमिका साकारत असतो आणि याची देही याची डोळा प्रेक्षक ते नाटक जगत असतात ते फार महत्त्वाचे आहे. अनेकदा नाटक बघायला आपले मित्रमंडळीही येतात. पण नाटक पाहताना मला कुठेही वैभव मांगले दिसला नाही तर त्या व्यक्तिचीच व्यथा दिसत होती असे जेव्हा आपले इंडस्ट्रीमधले मित्र सांगतात तेव्हा फार बरं वाटतं. लोकं तुम्हाला विसरुन त्या व्यक्तिरेखेशी एकरुप होतात ही गंमत नाटकाशिवाय दुसरीकडे कुठेच मिळत नाही. त्यामुळेच मराठी कलाकारांसाठी नाटक ही खरी तर जगण्याची कला आहे. कलेला खतपाणी मिळतं आणि त्यातून कोणताही कलाकार हा अधिक समृद्ध होत जातो.

उदाहरण द्यायचे झाले तर बमन इराणी, नसिरुद्दीन शहा, परेश रावल हे आजही थिएटर करतात. त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून ते थिएटर करतात असे मुळीच नाही. पण स्वतःला अधिक समृद्ध करण्यासाठी ते थिएटरकडे वारंवार ओढले जातात. मराठी रंगभूमीकडे स्वतःकडे ओढून घेण्याची शक्ती आहे. माझी नाळ कायमस्वरुपी त्याच्याशी जोडली जावी म्हणून मी नाटक करतो आणि करत राहणार. मला सिनेमा, मालिका ही सगळीच माध्यमं आवडतात पण माझं प्रेम मात्र आजही नाटकांवरच आहे.

वाडा चिरेबंदी हे अत्यंत गंभीर नाटक आहे. या नाटकासोबतच मी करुन गेलो गाव हे विनोदी नाटकही करत होतो. करुन गेलो गावमध्ये मी संगमेश्वरी शैलीत बोलतो तर वाडा चिरेबंदीमध्ये मी वऱ्हाडी भाषा बोलतो. अनेकदा या दोन्ही नाटकांचे प्रयोग मागे पुढेच लागलेले असायचे. त्यामुळे प्रेक्षकही एक नाटक झाल्यावर दुसरं पाहण्यासाठी यायचे. वाडा चिरेबंदी हे नाटक पाहून झाल्यावर एक गृहस्थ माझ्याकडे आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होते. ते मला म्हणाले की, माझा विश्वासच बसत नाही की ज्या माणसाला आम्ही सकाळी विनोदी नाटकात हशा पिकवताना पाहिलं तोच माणूस संध्याकाळी गंभीर भूमिका एवढ्या चपखलपणे करतो. म्हणून मी सतत म्हणतो की कलाकाराला आयुष्यात काही वेगळे अनुभव घ्यायचे असतील तर त्यांनी नाटक हे केलेच पाहिजे.

आजही मला तुमचा सिनेमा पाहिला तो मला आवडला या वाक्यापेक्षाही, तुमचे नाटक पाहिले फार आवडले हे अधिक भावतं. अंतु बर्वा साकारतानाही मी अनेकदा तिथेच रडतो. कारण प्रेक्षकही जेव्हा तुमच्याकडे डोळे लावून पाहत असतात तेव्हा प्रेक्षक आणि नट यातले जे अंतर असते ते निघून जातं असच वाटतं.

मधुरा नेरुरकर, madhura.nerurkar@indianexpress.com