News Flash

नाटकामुळे त्या तिघींची मैत्री झाली

अनुभवातूनच माणूस समृद्ध होत असतो.

नाटकामुळे त्या तिघींची मैत्री झाली
शशांक केतकर

नाटक हा विषय जसा तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा असतो तसाच तो कलाकारांच्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणू नच प्रत्येक कलाकार त्याला नाटकात काम करता यावे यासाठी धडपडत असतो. गोष्ट तशी गमतीची या नाटकात काम करण्याचा अनुभव आणि त्यातल्या गमती जमती सांगतोय प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर…

नाटकाचा ठराविक असा एक किस्सा सांगता येणार नाही. आतापर्यंत गोष्ट तशी गमतीची या नाटकाचे ३५५ प्रयोग झाले. वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग होत असताना, प्रत्येक ठिकाणचा अनुभव हा वेगळा असतो. कोकणातले स्टेज वेगळे असतात तर अगदी लंडनमधले वेगळे असतात. लंडनमध्ये गोष्ट तशी गमतीची या नाटकाच्या प्रयोगासाठी तिथल्या मंडळाने संपूर्ण चर्च त्या दिवसासाठी भाड्याने घेतले होते. त्यावेळी आम्ही चर्चमध्ये नाटक केले होते. सगळ्यात जास्त किस्से हे अनेकदा नाटकांमध्ये जी प्रॉपर्टी वापरली जाते त्यासंदर्भात घडतात. अनेकदा नाटकाचा प्रयोग सुरु असताना जी गोष्ट पुढे हवी असते ती मागेच राहते किंवा एखादी गोष्ट त्या जागीच नसते. त्यामुळे ऐनवेळी जर ती गोष्ट तिकडे नसेल तर त्या अनुषंघाने काही वाक्य अधिकची घेऊन गोष्टी सांभाळून घ्यावा लागतात.

अनेकदा दौऱ्यांमध्ये उत्साहाच्या भरात एखाद्या गोष्टीची जागाच बदलून टाकलेली असते. एका प्रयोगावेळी माझ्याबरोबरही असेच झाले होते. प्रयोग रंगात आलेला असताना एका क्षणी मला उजव्या बाजूने बाहेर जायचे असते. सवयीप्रमाणे मी उजवीकडे वळून एक्झिट घेत होतो. पण त्या दिवशी ते दार उजवीकडे न लावता डावीकडे लावले होते. त्यामुळे मी त्या भिंतीवर जाऊन आपटलो. काही क्षणासाठी मलाही कळले नाही की नक्की काय झाले. मला असा आपटलेला बघून लीना भागवत आणि मंगेश कदम हे दोघंही हसायला लागले होते.

नाटकात मंगेश, खिशात पैसे आहेत ना? अशा पद्धतीचा संवाद नेहमी म्हणत असतो. पण, जेव्हा नोटाबंदी लागू केली होती त्यामुळे खिशात डेबिट कार्ड आहे ना? असा बदल आम्ही त्या वाक्यात तेव्हा केला होता. पण अनेकदा सवयी प्रमाणे खिशात पैसे आहेत ना हाच संवाद बोलायची सवय झाली असल्यामुळे आम्ही त्याचा खूप सराव केला होता. या एका वाक्याचा आम्ही एवढा सराव केला की, ऐन नाटकाच्या प्रयोगावेळी हे वाक्य बोलायचे आहे, हे लक्षात ठेवलेले असल्यामुळे आधीची चार वाक्य विसरलीच गेली. तसे अनेकदा नाटकात लांबच्या लांब वाक्य असतात. ती वाक्य बोलताना फार तारेवरची कसरत होते. सुरुवातीला काही प्रयोगांवेळी माझी तशी फजीती झाली होती.

गोष्ट तशी गमतीची या नाटकाला प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिली आहे. जीतू भागवत नावाचे एक गृहस्थ आहेत. त्यांनी पुण्यात आतापर्यंत जेवढे प्रयोग झाले मग ते कोणत्या मंडळाने आयोजित केलेले असो किंवा व्यावसायिक प्रयोग असो जितू भागवतांनी आतापर्यंतचे पुण्यातले सगळेच प्रयोग पाहिले आहेत. पहिल्या काही प्रयोगानंतर जेव्हा आमच्या टीमला कळले की ही व्यक्ती पुण्यातल्या प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाला असते तेव्हापासून नाटकाच्या टीमने निर्णय घेतला की त्यांना मोफत नाटक बघायला द्यायचे. आतापर्यंत ते नेहमी पहिल्या रांगेत मधल्या सीटवर बसून नाटक पाहायचे. आताही ते तसेच बसून नाटक पाहतात. आता ते गोष्ट तशी गमतीची या नाटकाच्या टीमचाच एक भाग झाल्यासारखे आम्हाला वाटते.
तसेच मुंबईतील एका प्रयोगा दरम्यान, ३५ ते ४० वयोगटातल्या महिला हे नाटक बघायला आल्या होत्या. अनेकदा आपल्या बाजूला कोण बसले आहे हे आपल्याला माहित नसते. नाटकाच्या मध्यांतरामध्ये चुकून एखाद्याशी बोलणेही होते. असेच या तिघींमध्ये ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यातली एक बोरिवलीला राहते तर दुसरी ठाणे आणि तिसरी मुलुंडला राहते. या तीन ठिकाणी कुठेही प्रयोग असल्या की या तिघी आवर्जुन नाटकाला येतात.

पण या सगळ्यात ऐन प्रयोगावेळी फोन वाजणे, फोनवर जोरजोरात बोलणे यांसारखे प्रकारही सर्रास होत असतात. ते खूप वाईट आहे. हे कुठेतरी थांबणे आवश्यक आहे. शेवटी या सगळ्या अनुभवातूनच माणूस समृद्ध होत असतो. नाटक हा माझा आत्मा आहे. आत्म्याशिवाय माणूस जिवंतच राहू शकत नाही. त्यामुळेच या वर्षी मी अजून दोन नाटकं करणार आहे.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2017 9:50 am

Web Title: katha padyamagchi shashank ketkar talks about his experience in gosht tashi gamtichi
Next Stories
1 शाहरुख, सैफ, अक्षयचा हा फोटो व्हायरल
2 मुंबई पोलिसांची खिल्ली उडविल्याने शोभा डे पुन्हा वादात
3 मिलिंद चंपानेरकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार
Just Now!
X