नाटक हे प्रेक्षकांचे मनोरंजन जरी करत असलं तरी ते मनोरंजन करणारे कलाकारही शेवटी माणूस असतात. त्यांनाही भावना असतात. पण कधी कधी कठीण प्रसंगातही ते फक्त नाटकाच्या प्रेमासाठी कसे सारं काही विसरुन जातात याचाच एक अनुभव सांगितलाय अभिनेता सुयश टिळक याने..

कोल्हापुरला आमचा स्ट्रॉबेरीचा प्रयोग होता. त्या दिवशी आम्ही गोव्यावरुन कोल्हापुरला जाणार होतो. मी माझी गाडी घेऊन पुढे आलेलो तर बाकीचे कलाकार मागच्या गाडीने येत होते. मी गोव्यावरुन थोडा लवकर निघालो होतो त्यामुळे मी कोल्हापुरला आधीच पोहोचलो. पण मागच्या गाडीला यायला वेळ लागल्यामुळे प्रयोग सुरु करायला आम्हाला अर्धा तास उशिर होणार होता. प्रेक्षकांनीही सहकार्य केले. तेही तेवढा वेळ थांबून होते. थोड्या वेळाने प्रयोग सुरुही झाला, प्रयोग रंगात असताना अचानक स्पॉटची काच तडकली आणि ती काच सरळ खाली पडली. खाली सतरंजी असल्यामुळे आणि काच गरम असल्यामुळे आग लागते का अशी भीती मला वाटत होती. ती काच फार गरम होती, पण त्याने आग लागू नये या भीतीने मी ती काच उचलली आणि विंगेत फेकली. त्यामुळे माझा हात फार भाजला होता. त्यावेळी मी आणि सुरुची दोघंच सेटवर होतो. आम्ही प्रयोग न थांबवता तो तसाच सुरु ठेवला होता पण मला आतून फार दुखत होतं. गरम काच उचलल्यामुळे माझी बोटं सुजली होती. सुरुचीने तेव्हा प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पटकन पाण्याचा पेला आणला आणि त्यात मी माझी बोटं बुडवून तो प्रयोग न थांबवता पूर्ण केला होता.

तर दुसरीकडे महाडला प्रयोग सुरु करण्याच्या काही मिनिटं आधी मला अश्विनी एकबोटे यांचे निधन झाल्याची बातमी कळली होती. तिच्या अचानक जाण्यामुळे मी फारच हादरलो होतो. मी ढसाढसा रडत होतो. मी तो प्रयोग करु शकेन की नाही हेही मला माहित नव्हते. प्रयोग सुरु असतानाही मला काही आठवत नव्हतं, त्यामुळे प्रयोग पूर्ण होईल की नाही हेही मला कळत नव्हते. अनेकदा असेही झाले होते की मला पुढची वाक्य आठवत नव्हती. तेव्हा सुरुची सांभाळून घेत होती. तो प्रयोग जेव्हा संपला तेव्हा मी रुममध्ये जाऊन फार रडलो. मी नंतर प्रयोगामध्ये केलेल्या चुकांबद्दल प्रत्येकाची माफीही मागितली. पण प्रेक्षकांना त्या दिवशीचा प्रयोग फार आवडला होता.

या प्रसंगातून मला असा अनुभव मिळाला की, एकदा का तुम्ही रंगमंचावर गेलात की ते एक वेगळंच जग असतं. तो रंगमंच तुम्हाला खूप काही शिकवत असतो.

शब्दांकन- मधुरा नेरूरकर

madhura.nerurkar@indianexpress.com