आठ वर्षांच्या चिमुरडीवर झालेला बलात्कार आणि तिची हत्या करण्यात आल्याच्या कृत्याचा सध्या संपूर्ण देशातून निषेध करण्यात येत आहे. जम्मू काश्मीर येथील कठुआमध्ये झालेल्या या घटनेचा तीव्र निषेध केला जात असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली. बलात्कारांच्या वाढच्या प्रकरणांमुळे हरवत चाललेल्या माणुसकीचा मुद्दा सध्या प्रकाशझोतात असतानाच आता लोकांच्या मानसिकतेवर काळीमा लावणारं एक उदाहरण समोर आलं आहे. कठुआ बलात्कार प्रकरणाविषयी पॉर्न साइटवर काहीजणांनी सर्च केलं असून, यातून पुन्हा एकदा राक्षसी वृत्तीचा चेहरा सर्वांसमोर आला आहे.

अतिशय गंभीर अशा या मुद्द्यावर रॅपर रफ्तार सिंगने संताप व्यक्त केला आहे. त्याने इन्स्टाग्राम पोस्ट पाहता रफ्तारचं रक्त खवळल्याचं लगेचच लक्षात आलं. रफ्तारने यासंबंधीचा एक स्क्रिनशॉट शेअर करत, ‘ही आहे माझ्या देशाची विचारसरणी… भारतात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे’, अशी पोस्ट केली. ‘एखादी गोष्ट ट्रेंडमध्ये तेव्हाच येते जेव्हा तिच्याविषयी जास्तीत जास्त वेळा सर्च केलं जातं. सद्यस्थिती पाहता तुम्हीच सर्वजण याचा अंदाज लावू शकता की, अनेकांच्याच डोक्यात किती घाणेरडे विचार चाळवले आहेत’, असं म्हणत रफ्तारने संताप व्यक्त केला. त्याच्या या पोस्टला सोशल मीडियावर अनेकांनीच दाद देत, कठुआ प्रकरणी चुकीची मतं मांडणाऱ्यांची निंदा केली.

वाचा : बलात्कार करणाऱ्यांना जगण्याचा हक्क नाही; रेणुका शहाणे यांची जळजळीत पोस्ट

ही पोस्ट केल्यानंतर रफ्तारने अतिशय महत्त्वाचा मुद्दा सर्वांसमोर मांडला. ‘मी एक माणूस असून, मला आता माणुसकीचीच लाज वाटू लागलीये’, असं म्हणत हरवत चाललेल्या माणुसकीसाठी लढा द्या, आपल्या मुलांना महिलांचा आदर करण्याची शिकवण द्या, त्यांच्यासमोर चांगली उदाहरणं प्रस्थापित करा असा महत्त्वाचा संदेशही दिला.